Maharashtra Buldhana Crime News: पाचपटीनं रक्कम देण्याचं आमिष दाखवून 25 लाख रुपये घेऊन पसार झालेल्या बुलढाणा जिल्ह्यातील (Buldhana District) संग्रामपूर तालुक्यातील (Sangrampur Taluka) दोन आरोपींच्या मुसक्या सोलापूर (Solapur News) पोलिसांनी आवळल्या आहेत. सोलापूर पोलिसांनी (Solapur Police) बुलढाण्यातील संग्रामपूर येथे कारवाई केली. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मेडत येथील एका शेतकऱ्याला चालू चलनातील 25 लाखांच्या नोटांच्या मोबदल्यात पाचपटीनं दोन हजार रुपयांच्या नोटा म्हणजेच, सव्वा दोन कोटी रुपये किमतीच्या नोटा देण्याचं आमिष आरोपींनी दाखवलं होतं. हा व्यवहार शनिवारी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान भांबुर्डे तालुका माळशिरस येथे झाला. आरोपीनं शेतकऱ्यांकडून 25 लाखांची रक्कम घेऊन पोबारा केला होता. त्यानंतर फसवणूक झाल्याचं लक्षात येताच शेतकऱ्यानं माळशिरस पोलीस ठाणं गाठलं. सोलापूर पोलिसांनी काल बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील टुनकी येथे कारवाई करत शिवाजी लोणकर आणि त्याच्या सोबतच असलेला आरोपी नवनाथ नाथा या दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून सोळा लाख रुपये जप्त केले आहेत.
सोलापूर पोलिसांची बुलढाण्यात कारवाई
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस येथे पोलिसांनी गुन्हा नोंदवून बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर येथे कारवाई केली. शेख शकील, शेख उमर राहणार धामणगाव गोतमारे तर संग्रामपूर तालुक्यात असलेल्या टुणकी येथे शिवाजी लोणकर यास ताब्यात घेतलं. यातील तिसरा आरोपी नवनाथ उर्फ नाथा याला पुणे जिल्ह्यातील वाघोली येथून ताब्यात घेतलं आहे. यावेळी आरोपींनी वापरलेली आर्टिका कार पोलिसांनी जप्त केली आहे. संग्रामपूर येथील आरोपीकडून आठ लाख रुपये तर टुणकी येथील आरोपीकडून सोळा लाख रुपये असे 24 लाख रुपये सोलापूर पोलिसांनी जप्त केले आहेत.
तामगाव पोलिसांची सोलापूर पोलिसांना मदत
आरोपी हे 25 लाख रुपये घेऊन बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूरकडे रवाना झाल्याची माहिती सोलापूर पोलिसांना मिळाल्यावर सोलापूर पोलिसांनी तात्काळ बुलढाण्यातील तामगाव पोलिसांना संपर्क केला. सदरहू आरोपींवर लक्ष ठेवण्याची विनंती केली. याप्रकरणी तामगाव पोलिसांनी सोलापूर पोलिसांना चांगली मदत करत, या आरोपींना कव्हर करत अटक करण्यास मदत केली. त्यामुळे आरोपींजवळून 24 लाख रुपये जप्त करणं सोलापूर पोलिसांना सहज शक्य झालं आहे.
संग्रामपूर तालुक्यात अनेक गुन्हेगारांचं लपण्याचं ठिकाण?
या कारवाईमुळे मात्र बुलढाण्यातील संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी भागातील अवैध शस्त्र बनावट चलनी नोटा आणि आता आर्थिक फसवणुकीचे गुन्हेगार लपलेले असल्याचं समोर येत आहे आणि यामुळे खळबळ उडाली आहे.