बुलढाणा : कत्तलीसाठी ट्रकमधून गायी घेऊन जात असल्याच्या संशयावरुन जमावाने ट्रक पेटवून दिल्याची घटना बुलढाण्यात घडली. नागरिकांनी ट्रकमधील गायी बाहेर काढून ट्रक पेटवला. यावेळी काही काळ तणााचं वातावरण निर्माण झालं होतं. सध्या या ठिकाणी दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आलं असून परिस्थिती नियंत्रणात आहे. 


बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 06 वर मध्यरात्री ही घटना घडली. मंगळवारी (31 मे) रात्री एका ट्रकमधून कत्तलीसाठी गायी घेऊन जात असल्याचं नागरिकांना दिसलं. खामगावहून मध्य प्रदेशच्या दिशेने 25 गायी घेऊ जाणारा ट्रक नांदुरा शहरात बिघाड झाल्याने एका ठिकाणी थांबला. मात्र त्यातील गायींचा ओरडण्याचा आवाज नागरिकांना आला. या ट्रकमध्ये 25 गायींना कोंबून भरलं होतं. नागरिकांनी त्यातील गायींना तात्काळ बाहेर काढलं. पण त्यातील आठ गायींचा आधीच मृत्यू झालेला होता. काहींनी पोलिसांना फोन करुन याची माहिती दिली. 


दरम्यान नागरिकाचा संताप पाहून ट्रक चालक आणि त्याचा साथीदार घटनास्थळावरुन पसार झाले. मात्र नागरिकांच्या मनात संताप असल्याने त्यांनी त्या ट्रक पेटवून दिला. यावेळी शहरात काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी दंगल नियंत्रण पथक तैनात करुन परिस्थिती नियंत्रणात आणली असून चालक आणि त्याच्या साथीदारावर गुन्हा दखल केला. पोलिसांनी उर्वरित गायींना गोरक्षण संस्थेकडे पशु चिकित्सकांच्या निगराणी पाठवल्या आहेत. इथे त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. 


महाराष्ट्रात 2015 पासून गोवंश हत्या बंदी कायदा
महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये गोवंश हत्या बंदी कायदा लागू आहे. महाराष्ट्रात 4 मार्च 2015 पासून गोवंश हत्याबंदी कायद्याच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली. गोवंश म्हणजे गाय, बैल आणि वळू या प्राण्यांची संख्या कमी होऊ नये आणि त्यांचं संवर्धन करण्यासाठी आणि त्यांना कत्तलखान्यापासून वाचवण्यासाठी हा कायदा लागू करण्यात आला आहे. या कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांसाठी कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.