बुलढाणा : शेतकऱ्यांनी शेती करायची किंवा नाही? असा प्रश्न आता शासनाला विचारण्याची वेळ शेतकऱ्यांना आली आहे. आणि त्याचा कारणही तसंच आहे. आज एन होळी सणाच्या दिवशी बुलढाणा जिल्ह्यातील शिवणी अरमाळ गावच्या राज्य सरकारचा आदर्श युवा शेतकरी पुरस्कार मिळालेल्या एका युवा शेतकऱ्याने तीन पानांची सुसाईड नोट लिहून विषारी औषध घेऊन आत्महत्या केली आहे. 


बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील शिवनी आरमाळ गावचे युवा शेतकरी कैलास नागरे असं त्यांचं नाव आहे. गेल्यावर्षी, 15 डिसेंबर 2024 रोजी यांनी देऊळगाव राजा तालुक्यातील 14 गावांना खडकपूर्णा जलाशयातून शेतीसाठी पाणी मिळावं या मागणीसाठी अन्नत्याग आंदोलन केलं होतं. मात्र त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी नेहमीच प्रमाणे त्यांची आश्वासन देऊन बोळवण केली.


पाणी मिळाले नाही तर सामूहिक आत्महत्येचा इशारा


शासनाने दिलेल्या आश्वासनानुसार, गेले तीन महिने कैलास नागरे यांनी आपल्या परिसरातील शेतकऱ्यांना खडकपूर्णा जलाशयातून पाणी मिळेल या आशेवर काढली. मात्र नेहमीप्रमाणे शासनाची आश्वासने हवेतच विरली आणि ऐन होळी सणाच्या दिवशी कैलास नागरे यांनी तीन पानांची सुसाईड नोट लिहत विषारी औषध घेऊन आत्महत्या केली आहे. ही आत्महत्या नसून सरकारने केलेला खून असल्याची भावना परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली. तर याप्रकरणी लवकरच शेतकऱ्यांना पाणी मिळालं नाही तर आम्ही सामूहिक आत्महत्या करू असा इशाराही मृतक शेतकरी कैलास नागरे यांच्या पत्नीने दिला.


राज्य शासनाने या शेतकऱ्याला नुकताच आदर्श शेतकरी पुरस्कार दिला पण त्याला सरकार न्याय देऊ शकले नाही. शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आक्रमक झाले. सरकारला शेतकऱ्यांप्रती कुठलाही कळवळा नसून फक्त राज्यात जातीय तेढ या सरकारला निर्माण करायचं आहे अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.


सरकार शेतकऱ्यांना पुरस्कार देतं मात्र न्याय देऊ शकत नाही अशी म्हणण्याची वेळ होळी सणाच्या दिवशी शेतकऱ्यांवर आली आहे. कारण आज एका आईने आपला मुलगा गमावला , एका पत्नीने आपला पती गमावला , मुलांनी आपला बाप गमावला , शेतकऱ्यांनी आपला सहकारी गमावला . मात्र  हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतरही सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर आहे की नाही असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे?


ही बातमी वाचा: