Buldhana Crime : बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात बनावट वाहन नोंदणी (Fake Vehicle Registration) करणार मोठं रॅकेट सक्रिय असल्याचं समोर आल्याने खळबळ उडाली आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात आतापर्यंत 34 वाहनांची बनावट नोंदणी केल्याचं उघड झाल्यानंतर बऱ्याच कालावधीनंतर परिवहन अधिकाऱ्यांनी 19 ऑक्टोबर रोजी पोलिसात तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी आतापर्यंत पाच आरोपींना अटक केली आहे. आरोपींच्या चौकशीतून अजूनही काही बनावट नोंदणी केलेल्या वाहनांचा शोध घेण्यात येत आहे.


आरोपींची शक्कल, बनावट नोंदणीसाठी ट्रॅक्टरसाठी राखीव ठेवलेली सीरिज वापरली 
बनावट नोंदणी करण्यासाठी आरोपींनी बुलढाणा जिल्ह्यातील नवीन ट्रॅक्टरसाठी राखीव ठेवलेली सीरिज वापरल्याने यात परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांचाही सहभाग असल्याची दाट शक्यता असल्याचं तपासात समोर आलं आहे. यातील काही आरोपी हे नागपूर शहरातील असून यापूर्वीही त्यांनी अशाप्रकारच्या नोंदणी केल्यामुळे नंदुरबार पोलीसात त्यांच्यावर गुन्हाची नोंद आहे. या प्रकरणी बुलढाणा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील चार कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई देखील करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणाचा खरा सूत्रधार अजूनही बाहेर असल्याने परिवहन विभागाची चिंता वाढली आहे.




आरोपींनी नागपुरातील वाहनांची केली नोंद
औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड येथील अर्षद खान आणि सुभाष मनाल या दोन आरोपींना बुलढाणा पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने या आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोन्ही आरोपींच्या चौकशीतून नागपूर इथून आणलेली अनेक वाहने बुलढाणा आणि नंदुरबार इथे नोंदणी करुन विकल्याची माहिती समोर आली आहे.


नागपूर येथील काही डीलर आता रडारवर
बनावट वाहन नोंदणी प्रकरणात बुलढाणा पोलीस आता अॅक्शन मोडमध्ये असून नागपुरातील काही वाहन डीलर पोलिसांच्या रडारवर आहेत. 34 पैकी 17 वाहने पोलिसांनी आतापर्यंत जप्त केली आहेत तर अजूनही अनेक वाहनांचा शोध पोलीस घेऊ शकले नाहीत. यात काही वाहने पश्चिम बंगालमधून आणली आहेत. त्यामुळे आगामी काळात बनावट वाहन नोंदणी करणार मोठं रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


नंदुरबार उपप्रादेशिक कार्यालयामार्फत 83 वाहनांची बनावट नोंदणी 
याआधी नंदुरबार इथल्या उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाची तांत्रिक यंत्रणा हॅक करत या कार्यालयामार्फत 83 विविध प्रकारच्या वाहनांची बनावट नोंदणी करुन 66 लाख 60 हजारांचा महसूल विभागाला भामट्यांनी चुना लावल्याची घटना घडली होती. नागपूर प्रादेशिक परिवहन कार्यालयात नंदुरबार जिल्ह्यातील एक वाहन ट्रान्स्फर करण्यासाठी गेले असता तिथल्या लिपिकाला त्या वाहनाच्या आरसी बुकबाबत शंका आल्याने त्यांनी त्या वाहनाबाबत नंदुरबारच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात चौकशी केली. या चौकशीत ते वाहन क्रमांक व्हीआयपी श्रेणीतले असल्याचं आढळून आलं. तसंच त्या क्रमांकावर कोणत्याही वाहन क्रमांकाचे रजिस्ट्रेशन झालेलं नसल्याचं दिसून आलं.