Farmer Suicide : राज्यात परतीच्या पावसानं (Rain) धुमाकूळ घातला आहे. याचा मोठा फटका राज्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. त्यांची उभी पिकं वाया गेली आहेत. त्यामुळं शेतकरी संकटात सापडला आहे. अशा स्थितीत काही ठिकाणी शेतकरी टोकाचं पाऊल उचलताना दिसत आहेत. अतिवृष्टीमुळं सोयाबीनचं (soybean) अपेक्षित उत्पन्न होणार नसल्याचा अंदाज पाहून बुलढाणा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.


अतिवृष्टीमुळं सोयाबीनच्या उत्पन्नाचं गणित हुकलं


सध्या पडणाऱ्या परतीच्या पावसानं शेतकरी अडचणीत सापडला आहे. या पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसत आहे. बुलढाण्यातही परतीच्या पावसामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. दिवसभर शेतात सोयाबीन जमा केल्यानंतर अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याचा अंदाज आल्यानं लोणार तालुक्यातील गोवर्धन नगरातील एका युवा शेतकऱ्यानं आत्महत्या केली. संदिप रमेश चव्हाण (४२) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संदिप चव्हाण त्यांच्या वसंतनगर शिवारातील शेतात सोयाबीन जमा करण्यासाठी गेले होते. यंदा सुरुवातीला झालेला अपुरा पाऊस आणि सोंगणीच्या वेळी झालेली अतिवृष्टी यामुळं सोयाबीनचे गणित चुकले आहे. त्यामुळं अपेक्षित उत्पन्न मिळणार नसल्याने संदीप चव्हाण चिंतेत होते. दिवसभर शेतात काम केल्यानंतर रात्री त्यांनी शेतातच मुक्काम केला. मात्र, सकाळी शेतातील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. दरम्यान याप्रकरणी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


भंडारा जिल्ह्यातही शेतकऱ्याची आत्महत्या


सततच्या नापिकीला कंटाळून एका वृद्ध शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना भंडाऱ्याच्या लाखनी केसलवाडा (वाघ) येथे घडली आहे. संताराम नारायण ढवळे (75) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना मंगळवारी घडली. सतत कोसळणाऱ्या पावसाने हातात आलेले पीक उद्ध्वस्त झाले. त्यामुळे नापिकीला कंटाळून  शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. 


नांदेड, परभणी, बीड जिल्ह्यातही शेतकरी आत्महत्या


नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील नरंगल येथे धक्कादायक घटना समोर आली असून, बँकेची कर्ज परतफेडीची नोटीस आल्याने नांदेडच्या शेतकऱ्याने केली गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाल्याने अडचणीत असतानाच, बँकेची कर्ज परतफेडीची नोटीस आल्याने या शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली आहे. प्रदीप मुकुंद पट्टेकर असे या शेतकऱ्याचे नाव आहे. नरंगल येथील प्रदीप पट्टेकर या युवा शेतकऱ्याने पेरणीसाठी एन.डी.सी बँकेकडून 32  हजार 888 रुपयांचे कर्ज घेतले होते. दरम्यान अतिवृष्टी, अवकाळी, दुबार पेरणी आणि परतीच्या पावसामुळे पिकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे यावर्षी हातात काहीच आले नाही. अशातच बँकेकडून नोटीस आल्याने प्रदीप हे चिंतेत होते. घरातील कुटुंब प्रमुख म्हणून तेच असल्याने त्यांच्यासमोर मोठी अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे या सर्वांना कंटाळून प्रदीप यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. 


परतीच्या पावसानं झालेलं सोयाबीनचं (Soybean) नुकसान आणि खासगी फायनान्सचं घेतलेलं कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून परभणी (Parbhani) जिल्ह्यातील कौसडी येथील एका शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याची घटना घडली. विषारी औषध घेऊन शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे. गुलाब जीवने (वय, 24 वर्ष) असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे.


राज्यात परतीच्या पावसाने सर्वत्र थैमान घातलं आहे. शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. बीड जिल्ह्यात राजेगाव येथील संतोष दौंड या हा शेतकरी देखील परतीच्या पावसामुळं नुकसान झाल्याने हतबल झाला होता. हाता तोंडाशी आलेला घास पावसानं हिरावून घेतल्यानं या शेतकरी बांधवानं नैराश्यातून आपली जीवनयात्रा संपवली होती.


महत्त्वाच्या बातम्या:


Farmer suicide : धक्कादायक! परभणीत 24 वर्षाच्या तरुण शेतकऱ्यानं संपवलं जीवन, परतीच्या पावसानं सोयाबीनचं झालं होतं नुकसान