Buldhana Crime : बुलढाणा (Buldhana) शहरालगत असलेल्या राजूर घाटात एका महिलेवर चाकूचा धाक दाखवून आठ जणांनी बलात्कार (Gangrape) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी बोराखेडी पोलीस ठाण्यात गुरुवारी (14 जुलै) रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाकूचा धाक दाखवून तरुणाला लुटलं तर महिलेवर आळीपाळीने अत्याचार
बुलढाणा मलकापूर मार्गावरील राजूर घाटात निसर्गरम्य वातावरण असल्याने अनेक पर्यटक या ठिकाणी निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येत असतात. अशीच एक महिला आणि तिच्या नातेवाईक मित्रासह देवीच्या मंदिर परिसरात गेले असताना काल दुपारच्या सुमारास त्या ठिकाणी आलेल्या आठ जणांनी महिलेसोबत असलेल्या तरुणाला चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील रोख रक्कम लुटून घेतली. यानंतर त्याच्यासमोरच संबंधित महिलेला देखील चाकूचा धाक दाखवून त्याच्यावर आठ जणांनी आळीपाळीने बलात्कार केल्याची तक्रार या तरुणाने बोराखेडी पोलीस ठाण्यात नोंदवली आहे.
तक्रारीनुसार संबंधित महिला आणि तिच्या समवेत असलेला व्यक्ती राजूर घाटात देवीच्या मंदिरानजीक सेल्फी काढण्यासाठी थांबले होते. या वेळी त्या ठिकाणी आठ जणांचा हा घोळका आला होता. त्यांनी तक्रारकर्त्या व्यक्तीसोबत असलेल्या महिलेच्या गळ्याला चाकू लावून फिर्यादीच्या खिशातील 45 हजार रुपये लुटले. सोबतच महिलेला दरीत ओढत नेऊन तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. यानंतर आरोपींनी तिथून पळ काढला.
गुन्ह्याची माहिती मिळताच संजय गायकवाडही बोराखेडी पोलीस ठाण्यात
दरम्यान ही घृणास्पद घटना समजताच शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी रात्री आठच्या सुमारास बोराखेडी पोलीस ठाणे गाठले. सोबतच पोलीस प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलं. या घटनेची माहिती अन्य शिवसेना तथा युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना (शिंदे गट) यांना कळाल्यानंतर त्यांनीही तातडीने रात्री बोराखेडी पोलीस स्टेशन गाठलं. घडलेल्या या गंभीर प्रकाराबाबत संजय गायकवाड यांनी पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनाही कल्पना दिली. त्यानंतर बोराखेडी पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी हालचाल सुरु केली. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून तात्काळ गुन्हा दाखल केला आहे. बलात्कार केल्यानंतर आरोपी तिथून पळ काढत असताना तक्रारकर्त्याने त्यांचा पाठलाग केला. आरोपी हे जवळच असलेल्या मोहेगाव इथे गेले असल्याच्या माहितीवरुन तेथील लोकांनी त्यातील एका आरोपीचं नाव राहुल राठोड असल्याचं तक्रारकर्त्याला सांगितलं.
हेही वाचा