बुलढाणा: बुलढाण्यात (Buldhana) एका महिलेला खोटे आरोप करणे चांगलेच अंगलट आले आहे. बलात्काराची खोटी तक्रार देऊन नंतर न्यायालयात आपला जबाब महिलेने फिरवला. आरोपीने बलात्कार केलाच नाही, अशी भूमिका घेतल्याने न्यायालयाने तक्रारदार महिलेलाच आरोपी करत दोन महिन्यांची कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. ई-फायलिंगद्वारे दाखल केलेलं अशा प्रकारचं हे पहिलंच प्रकरण आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील एका 27 वर्षीय महिलेने अमडापूर पोलीस स्टेशनला तिच्या पतीच्या मित्रांने ती घरात एकटीच असताना तिच्यावर बलात्कार केल्याची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 376 नुसार गुन्हा दाखल केला. पीडित महिलेने न्याय दंडाधिकारी समोर जबाब ही नोंदवला होता आणि प्रकरण न्यायप्रविष्ट केले होते. परंतु पीडित फिर्यादी महिलेने न्यायालयामध्ये साक्ष फिरवली आणि तिच्यासोबत आरोपीने कोणतेही कृत्य केले नाही असा खोटा पुरावा देऊन फितूर झाली होती. त्यामुळे न्यायालयाने आरोपीला पुराव्या अभावी निर्दोष मुक्त केले होते.
मात्र न्यायालयाने निर्णय देताना फिर्यादी महिलेने जाणून बुजून न्यायालयात खोटी साक्ष दिल्याची बाब ही समोर आणल्याचे निरीक्षण नोंदवले. त्यामुळे या तक्रारदार महिलेवर फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 344 नुसार वेगळी कारवाई करण्यात आली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.एन. मेहेरे यांनी स्वतः ई-फायलींच्या माध्यमातून हे प्रकरण दाखल केले होते. त्यानंतर फिर्यादी महिलेला आपली बाजू मांडण्याची संधीसुद्धा देण्यात आली होती. मात्र पीडित महिलेने आपले म्हणणे मांडले नसल्याने काल न्यायालयाने या महिलेला शिक्षा सुनावली.
न्यायालयात जाणून बुजून खोटी साक्ष दिल्याच दोषी धरत आणि यंत्रणेला कामाला लावल्याचा ठपका ठेवत फौजदारी प्रक्रियेच्या संहितेनुसार कलम 344 नुसार दोन महिन्याचा साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. विशेष म्हणजे ई-फायलिंगद्वारे दाखल केलेल असं हे पहिलंच प्रकरण आहे. त्यामुळे हा निकाल महत्त्वाचा मानला जात आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :