बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील सती फैल परिसरातील सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणपतीचे विसर्जन करून परत येताना गणेश भक्तांच्या वाहनाला अपघात झाला. एका दुचाकीला भरधाव ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात 12 गणेश भक्त जखमी झाले आहेत. यातील दोन जणांची प्रकृती चिंताजनक असून या सर्व जखमींवर खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


खामगाव शहराच्या वळण मार्गावर ही घटना रात्री बाराच्या दरम्यान घडली. त्यानंतर संतप्त नागरिकांनी या ट्रकला आग लावली. या आगीत संपूर्ण ट्रक जळून भस्मसात झाला आहे. या परिसरात पोलिसांनी आता मोठा पोलीस बंदोबस्त लावला आहे. या अपघातानंतर विसर्जनासाठी जाणऱ्या मंडळांना नियम पाळण्याचे आवाहन केले आहे. 


गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी जिल्हा प्रशासन व पोलीस दल सज्ज


बुलढाणा जिल्ह्यात आज गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी जिल्हा प्रशासन व पोलीस दल सज्ज असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी दिली आहे. जिल्ह्यात आज गणेश विसर्जन मिरवणुकीच्या बंदोबस्तासाठी 2500 पोलीस , 1500 होमगार्ड व एक राज्य राखीव पोलीस दलाची कंपनी तैनात करण्यात आलेली आहे . विसर्जन मिरवणुकीदरम्यान खामगाव शहरातील काही भागात कलम 144 सुद्धा लागू करण्यात आली आहे .तर संपूर्ण मिरवणुकीवर ड्रोन कॅमेराद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अनेक समाजकंटकांवर कारवाई करण्यात आलेली आहे व त्यामुळे जिल्ह्यातील गणेश विसर्जन शांततेत पार पाडण्याचा आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडकडे यांनी केलेला आहे.


चंद्रपूरात चार जणांचा मृत्यू, चार जण जखमी 



चंद्रपूर शहरातील बल्लारपूर बायपास मार्गावर बुधवारी (27 सप्टेंबर) रात्री हा अपघात झाला. भरधाव ट्रक एका ऑटोरिक्षावर उलटल्याने चार जणांचा मृत्यू झाला. तर अपघातात चार जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. संगीता चाहांदे (वय 56 वर्षे, रा. गडचिरोली), अनुष्का खेरकर (वय 22 वर्षे, रा. बल्लारपूर), प्रभाकर लोहे आणि ऑटो चालक इरफान खान (वय 49 वर्षे, रा. बाबूपेठ) अशी मृतांची नावे आहेत.  अष्टभुजा मंदिराजवळील रेल्वे उड्डाणपुलावरुन एक ट्रक (एम एच 34 एम 1817) भरधाव वेगात येत होता. परंतु वेगामुळे ट्रक चालकाचे नियंत्रण सुटलं आणि तो शेजारुन जाणाऱ्या एका ऑटोरिक्षावर (एम एच 34 एम 8064) उलटला. ट्रकखाली चिरडलं गेल्याने ऑटोतील चार प्रवाशांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, ज्यात रिक्षाचालकाचाही समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी प्रवाशांना उपाचारांसाठी शासकीय रुग्णालयात दाखल केलं आहे. राजकला मोहूर्ले (वय 34 वर्षे, रा. बाबूपेठ), गीता शेंडे (वय 50. रा. तुकुम, दशरथ बोबडे (वय 50 वर्षे, रा. वणी) अशी तीन जखमींची नावं असून एकाची ओळख अद्याप पटलेली नाही.