Agriculture News : आज गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर यंदाच्या खरीप हंगामातील नवीन सोयाबीन खरेदीचा (Soybean procurement) शुभारंभ करण्यात आला. बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील बीबी येथील बालाजी ट्रेडर्स येथे सोयाबीनची खरेदी करण्यात आली. यंदाच्या खरीप हंगामातील जिल्ह्यातील ही पहिलीच सोयाबीन खरेदी ठरली असून, सोयाबीनला प्रति क्विंटल 5 हजार 100 रुपयांचा भाव मिळाला आहे. यावेळी परिसरातील अनेक सोयाबीन उत्पादक शेतकरी हजर होते.
शेतकऱ्यांचा सत्कार
बुलढाणा जिल्ह्यात आजपासून सोयाबीनची खरेदीला सुरुवात झाली आहे. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर खरीप हंगामातील सोयाबीन खरेदी करण्यास सुरुवात झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील बीबी इथं शेतकरी तेजराव बनकर,अशोक वाघ आणि पंढरी लोढे यांच्या सोयाबीनची खरेदी करण्यात आली. यावेळी या शेतकऱ्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कारही करण्यात आला.
राज्यातील बहुतांश भागात पावसाची दडी, खरीपाची पिकं धोक्यात
राज्यातील शेतकरी खरीपातील पीक जगविण्यासाठी धडपडत आहे. कारण राज्यात पावानं चांगलीच ओढ दिली आहे. राज्यातील बहुतांश भागात पावसानं दडी मारली आहे. काही भागातच जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळं काही भागात खरीपाची पिकं वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळं राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत. दरम्यान, सुरुवातील पेरणी झालेली काही पिकं आता काढणीला आली आहेत, तर काही पिकांची काढणी झाली आहे. सुरुवातीला पेरणी केलेलं सोयाबीन सध्या विक्रीसाठी बाजारात आलं आहे. मात्र, या सोयाबीनला म्हणावा तसा दर मिळत नसल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. सुरुवातीला सोयाबीनला प्रति क्विंटल 5 हजार 100 रुपयांचा दर मिळाला आहे.
बळीराजावर दुहेरी संकट, काही भागात सोयाबीनवर यलो मोझ्याकचा प्रादुर्भाव
एकीकडे पावसानं (Rain) ओढ दिली आहे. तर दुसरीकडं आहे त्या पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. अशा दुहेरी संकटात राज्यातील बळीराजा (Farmers) सापडला आहे. सध्या पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिकं वाया जाऊ लागली आहेत, अशातच काही भागात सोयाबीन पिकावर (Soybean Crop) यलो मोझ्याक रोगाचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. त्याचा सोयाबीन पिकाला मोठा फटका बसत आहे. या रोगामुळे उत्पादन क्षमता 30 ते 90 टक्क्यांपर्यंत घटते. काही वेळा जास्त प्रादुर्भाव असल्यास पाने अरुंद होतात व मुरगळतात. लहान अवस्थेत प्रादुर्भाव झाल्यास पूर्ण झाड पिवळे पडते. अशा झाडांना कालांतराने फुले आणि शेंगा कमी लागतात किंवा त्यातील दाण्यांचा आकार लहान राहतो किंवा संपूर्ण शेंगा दाणे विरहीत राहून पोचट होतात आणि पर्यायाने उत्पन्नात मोठी घट येते. तर काही वेळेला सोयाबीन शेंगाच लागत नाहीत.
महत्त्वाच्या बातम्या: