बुलढाणा : शेतकरी आणि राजकीय नेत्यांसाठी बहुप्रतिक्षित असलेली भेंडवळची घट मांडणी (Bhendwal Ghatmandni) शुक्रवारी करण्यात आली. सूर्यास्ताच्या वेळी चंद्रभान महाराज यांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांनी भेंडवळ गावाबाहेर एका शेतात घट मांडणीची प्रक्रिया पूर्ण केली. शनिवारी सकाळी सूर्योदयावेळी या घटमांडणीचं निरीक्षण करून आगामी वर्षभराचे शेतीसंबंधी पावसा संबंधी, देशाच्या राजकीय भविष्यावर अंदाज वर्तविले जाणार आहेत. 


या घटमांडणीवेळी विदर्भ मराठवाडा आणि खानदेशातील शेकडो शेतकरी उपस्थित होते. शनिवारी सकाळी सूर्योदयावेळी नेमके काय अंदाज व्यक्त होतात हे जाणून घेण्यासाठी आज रात्री परिसरासह राज्यभरातून शेतकरी व राजकीय नेते भेंडवळ येथे आता मुक्कामी असणार आहेत.


अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा आक्षेप


मात्र अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या घट मांडणीवर अक्षय घेऊन या घट मांडणीच्या अंदाजावर विश्वास ठेवू नये असे शेतकऱ्यांना आवाहन केलं .आहे इतकंच काय तर या घट मांडणीच्या अंदाजामध्ये जर राजकीय भाकिते वर्तवण्यात आली तर आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करू असेही अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक अभयसिंह मारोडे यांनी म्हटलं आहे.


तब्बल 370 वर्षांपासूनची परंपरा 


बुलढाण्याच्या जामोद तालुक्यातील भेंडवळ गावात तब्बल 370 वर्षांपासून घट मांडणीची परंपरा सुरू आहे. भेंडवळमधील स्थानिक गावकऱ्यांसोबतच संपूर्ण राज्यभरातील शेतकरी मोठ्या विश्वासानं भेंडवळच्या घट मांडणीच्या अंदाजाची वाट पाहत असतात. आजही या घटमांडणीच्या अंदाजावरुन अनेक शेतकरी आपल्या वर्षभराच्या पिक पाण्याचं नियोजन करतात. 


महान तपस्वी चंद्रभान महाराजांनी जपलेला घट मांडणीचा वसा त्यांच्या वंशजांनी आजही टिकवून ठेवला. आता त्यांचे वंशज पुंजाजी महाराज वाघ आणि सारंगधर महाराज हे घट मांडणीनंतर घटाची पाहणी करून वर्षभराचे अंदाज जाहीर करतात. यावेळी राज्यभरातून अनेक शेतकरी भेंडवळमध्ये मुक्कामी येतात.


चंद्रभान महाराज वाघ यांनी सुमारे 1650 साली वातावरणातील बदलावरून नक्षत्रांचा अभ्यास केला. साधारणतः गुढी पाडवा ते अक्षय तृतीया या काळात ते परिसरातील जंगलात राहून निसर्गातील सूक्ष्म घडामोडी आणि वातावरणातील बदल, हवेची दिशा, पक्षांचे आवाज अशा घडामोडींचं सूक्ष्म निरीक्षण आणि अभ्यास करायचे. पुढे पाऊस, पिकांची भविष्यवाणी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी त्यांनीच ही घट मांडणीची प्रथा सुरू केली, असं भेंडवळचे गावकरी सांगतात. घटमांडणी अक्षय्य तृतीयेला होते. त्यातील बदलांवरून त्याच्या दुसऱ्चया दिवशी सूर्योदयापूर्वी सर्व अंदाज जाहीर केले जातात. 


(टीप : 'भेंडवळची घट मांडणी' ही बुलढाण्यातील भेंडवळ गावातील स्थानिक परंपरा आहे. त्यातून ते पावसाचा अंदाज वर्तवतात असा त्यांचा दावा आहे. स्थानिकांचा त्यावर विश्वास आहे. एबीपी माझा केवळ या घटनेचं वार्तांकन करतंय. घटमांडणीच्या परंपरेचं समर्थन करत नाही.)


ही बातमी वाचा: