बुलढाणा: जगप्रसिद्ध लोणार सरोवर परिसरात घनदाट जंगलात घडणाऱ्या अप्रिय घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस , वनविभाग आणि भारतीय पुरातत्व विभागाकडून कठोर पावले उचलण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे लोणार सरोवर (Lonar Lake) परिसरात भेट देणाऱ्या पर्यटकांना त्यांच् आधारकार्ड सोबत ठेवावे लागणार आहे. प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षकांना आधार कार्ड दाखवल्यावरच लोणार सरोवर परिसरात यापुढे प्रवेश मिळणार आहे.
लोणार सरोवर परिसरात जगभरातून पर्यटक येत असतात. या परिसरात घनदाट अभयारण्य सुद्धा आहे. या अभयारण्यात अनेकदा अप्रिय घटना घडतात. गेल्याच आठवड्यात परभणी जिल्ह्यातील एका युवकाचा खूनही या अभयारण्यात झाला होता. त्यामुळे अशा अप्रिय घटना घडू नये यासाठी यापुढे लोणार सरोवर परिसराला भेट देणाऱ्या पर्यटकांना आपले आधार कार्ड सोबत ठेवावे लागणार आहे. आधार कार्डवरून पर्यटकाचे नाव आणि आधार क्रमांक याची नोंद झाल्याशिवाय या परिसरात प्रवेश मिळणार नाही. तसेच बिना आधार कार्ड जर कोणी प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यावर पोलीस प्रशासन कठोर कारवाई करणार असल्याचं पोलीस प्रशासनातर्फे सांगण्यात आलं आहे.
उल्कापातामुळे लोणार सरोवराची निर्मिती
लोणारचे सरोवर महाराष्ट्र राज्यामधील बुलढाणा जिल्ह्यातले खाऱ्या पाण्याचे एक सरोवर आहे. याची निर्मिती एका उल्कापातामुळे झाली आहे. लोणार हे बेसॉल्ट खडकातील एकमेव मोठे आघाती विवर आहे. याचे पाणी अल्कधर्मी आहे. लोणार सरोवराच्या जतनासाठी व संवर्धनासाठी लोणार विवर हे वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केले आहे. या परिसरात अंदाजे बाराशे वर्षांपूर्वीची मंदिरे आहेत. त्यातील 15 मंदिरे विवरातच आहेत. अमेरिकेतील स्मिथसोनिअन संस्था, युनायटेड स्टेट्स जिओग्राफिकल सर्व्हे तसेच भारतातील जिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया, फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी यासारख्या संस्थांनी या सरोवरावर बरेच संशोधन केले आहे.
लोणार हे जगातील सर्वात मोठं अंडाकृती सरोवर आहे. उल्कापातामुळे या सरोवराची निर्मिती झाली आहे. लोणार सरोवर हे जगातील दुसरं सर्वात मोठं सरोवर आहे. जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या पाण्याच्या पातळीत अलीकडच्या काळात मोठी वाढ झाली आहे. पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळं लोणार सरोवर परिसरात असलेल्या पाच मंदिरांना पाण्यानं वेढा दिला होता. पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळं अभ्यासकांनी चिंता व्यक्त केली होती.
आणखी वाचा
जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या पाणी पातळीत वाढ, प्राचीन मंदिरांसह जैव विविधता धोक्यात