बुलढाणा : बुलढाण्यातील(Buldhana News) जगप्रसिद्ध असलेल्या लोणार सरोवर (Lonar Lake) परिसरात असलेल्या धारातीर्थ (Dharathirth) या पवित्र ठिकाणी भाविकांना स्नानासाठी घालून दिलेली बंदी पुरातत्त्व विभागाने उठवावी या मागणीसाठी आज लोणार सरोवराच्या काठावर असलेल्या धारातीर्थ या पवित्र स्थानिक शिवसेना ठाकरे गट (Shiv Sena Thackeray Faction) आणि सामाजिक संघटना यांनी आंदोलन केले. पुरात्व विभागाने घातलेली बंदी मोडत या तीर्थक्षेत्राच्या भोवती लावलेले बेरीकेटस तोडून या ठिकाणी आज स्नान आंदोलन करण्यात आले. यावेळी महिलाही मोठ्या संख्येने आंदोलनात सामील झाल्या
जग प्रसिद्ध लोणार सरोवराच्या परिसरात अनेक पुरातन मंदिर आहेत. या परिसरात सरोवराच्या काठावर एक भगवान विष्णू आणि महादेवाचं ही प्राचीन मंदिर आहे. या मंदिराच्या खाली एक गोमुख आहे, ज्यातून वर्षभर अविरत पाण्याची भली मोठी धार पडत असते. त्यामुळे याला धारा तीर्थ म्हणून ओळखलं जातं. या परिसरात देश विदेशातून पर्यटक येत असतात. तर अनेक भाविकही दर्शनाला येतात. या पाण्याच्या धारेखाली स्नान केल्यास अनेक दुर्धर आजारही बरे होतात अशी भावना काही भक्तांची आहे. त्यामुळे दूरवरच्या ठिकाणावरून भाविक या धारातीर्थी पवित्र स्नान करण्यासाठी येत असतात. मात्र, लोणार सरोवर हा जागतिक वारसा असल्याने आणि परिसरातील वास्तूंचं जतन करण्यासाठी हा परिसर केंद्रीय पुरातत्व विभागाने आपल्या देखरेखीत घेतला आहे. कोरोना काळात पुरातत्व विभागाने या ठिकाणी स्नान करण्यास बंदी घातली होती. आता कोरोना संपुष्टात आला असूनही ही बंदी कायम असल्याने याठिकाणी भाविकांना स्नान करण्यास मज्जाव करण्यात आला.
स्थानिक संघटना तसेच भाविकांच्यावतीने अनेकदा निवेदने देऊन ही बंदी मागे घेण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, पुरातत्व विभागाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने आज लोणार परिसरातील हिंदुत्ववादी संघटना, शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते, काही सामाजिक संघटनांनी आंदोलन करत ही बंदी मोडीत काढली. आंदोलकांनी स्नान करण्याच्या परिसरात लावलेले बेरीकेट्स तोडून धारातीर्थ सामान्य भाविकांसाठी खुल केलं. यावेळी महिलांनी ही आंदोलनात मोठा सहभाग नोंदविला.
धारा तीर्थ या पवित्र स्थळावर स्नानसाठी लावण्यात आलेली बंदी झुगारून आंदोलकांनी या ठिकाणी स्नान केले. सामान्य भाविकांकडूनदेखील या आंदोलनास पाठिंबा मिळाला. आता या आंदोलनानंतर पुरात्व विभाग काय कारवाई करणार, हे बघणे महत्वाचं असेल. मात्र आज दिवसभर हजारो भाविकांनी अनेक वर्षाच्या कालखंडानंतर या पवित्र ठिकाणी स्नान केले.