नवी दिल्ली :  जी-20 शिखर परिषद (G 20 Summit) संपल्यानंतर काहीच वेळात भारताकडून चीनला (China) एक मोठा संदेश देण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. भारत लडाखच्या न्योमा भागात जगातलं सर्वात उंच लढाऊ हवाई क्षेत्राची निर्मिती करणार आहे. या योजनेचा शिलान्यास केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. 12 सप्टेंबर रोजी जम्मूमधील देवक पुलापासून याची सुरुवात करण्यात येईल. 






सध्या एलएसीवर सुरु असलेल्या चीनसोबतच्या वादाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्रालयाकडून घेण्यात आलेला हा निर्णय अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. पूर्व लडाखमधील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या न्योमा पट्ट्यात बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनद्वारे नवीन एअरफील्ड बांधण्यासाठी एकूण 218 कोटी रुपये खर्च येणार आहे. चीनला चोख उत्तर देण्यासाठी या एअरफिल्डची रचना करणे हे भारताकडून उचलण्यात आलेले अत्यंत महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. 


दोन्ही देशांमध्ये तणावपूर्वक परिस्थिती


मागील तीन वर्षांपासून पूर्व लडाखमधील न्योमा अॅडव्हान्स लँडिंग मैदानाचा वापर भारतीय सैन्याकडून केला जात आहे. वाहतूकीसाठी आणि युद्धाच्या सामग्रीची ने- आण करण्यासाठी या मैदानाचा वापर भारताकडून केला जात आहे. 2020 मध्ये गलवानमध्ये भारत आणि चीनच्या सैन्यात झालेल्या संघर्षानंतर दोन्ही देशांमध्ये अजूनही तणाव कायम आहे.


उच्चस्तरीय चर्चा सुरु 


दरम्यान हा तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांच्या सैन्य अधिकाऱ्यांकडून उच्च स्तरीय चर्चा सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे. तर अधिकाऱ्यांच्या चर्चेनंतर दोन्ही देशांच्या प्रमुख नेत्यांमध्ये देखील या मुद्द्यावरुन चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलीये. भारत आणि चीनची सीमावाद हा काही नवीन नाही. भारतीय सैन्याकडून चीनच्या प्रत्येक कुरघोडींना जशास तसं उत्तर देखील देण्यात येतं. पण तरीही चीनच्या कुरघोड्या काही केल्या थांबायचं नाव घेत नाही. हे एअरफिल्ड उभारण्याचा निर्णय घेणं ही देखील चीनसाठी भारताकडून देण्यात आलेली एक सूचना आहे असं म्हटलं तरी त्यात वावगं ठरणार नाही. त्यामुळे आता यावर चीनची काय भूमिका असेल हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


हेही वाचा : 


PM Modi : G-20 परिषदेत जागतिक जैवइंधन आघाडीची घोषणा, जागतिक ऊर्जा क्षेत्रातील ऐतिहासिक क्षण : पंतप्रधान