यवतमाळ : सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होणारा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यवतमाळमध्ये, एका शेतकऱ्याने जंगली झाडाची पीक म्हणून शेतकऱ्यांना ओळख करुन दिली आहे. या जंगली झाड-पीकातून त्याने लाखो रुपयाचं उत्पन्न मिळवलं आहे.


 

गुलाबी-पांढरी फळ कोणती हा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल. पण ही फळ तुमच्या ओळखीचीच आहेत.गावाकडं जिला डोंगरची काळी मैना म्हणून ओळखलं जात तीच ही करवंदं.



यवतमाळच्या पुसद तालुक्यातील जनार्धन जाधव यांनी २० वर्षापूर्वी या रानमेव्याचं महत्त्व ओळखलं. जंगली समजल्या जाणाऱ्या दुर्लक्षित झाडाला त्यांनी आधी बांधावर आणि नंतर थेट शेतीत आणलं.

 

७५ वर्षाचा हा तरुण या रानमेव्यापासून वर्षाकाठी १० लाखांपर्यंत उत्पन्न मिळतोय.

 

इथल्या वरुड गावात ६ एकरावर परसलेली गुलाबी करवंदाची बाग त्यांनी मोठ्या कष्टानं जपली आहे. इथं हिरवी आणि गुलाबी जातीची ४ हजार झाडं आहेत. मे-जून महिन्यात या झाडांना फुलं लागतात, तर पहिल्या पावसानंतर फळधारणा होते.

 

हे झाड जंगली असलं तरी जनार्दनराव त्यांची विशेष काळजी घेतात. झाडांच्या गरजेनुसार त्यांना सेंद्रीय खतं देतात. त्यामुळं या करवंदाचा आकार मोठा आणि एकसारखा पाहायला मिळतो. विशेष म्हणजे जंगली पीक असल्यानं याच्यावर कोणताही किड-रोग येत नाही.

 

करवंदाची औषधी गुणधर्म पाहता या रानमेव्याला शहरात मागणी वाढत आहे. करवंदापासून कार्बोहायड्रेट, प्रथिनं आणि क जीवनसत्व मुबलक प्रमाणात मिळतं.

 

करवंदांचा उपयोग मुरब्बा, जाम-जेली आणि लोणचं बनवण्यासाठी केला जातो. व्यापारी या करवंदांची थेट शेतावर येऊन खरेदी करतात.

 

*या ६ एकरातून जनार्दन यांना सरासरी ३० ते ३५ टन करवंदांचं उत्पादन मिळतं.

*व्यापारी या करवंदांना ३० रुपये किलोचा दर देतात.

*यातून वर्षाकाठी त्यांना ९ ते १० लाखांचं उत्पन्न मिळतं.

*यात सर्वात मोठा खर्च मजुरीचा आहे. २ ते अडीच लाख रुपये मजुरीवर खर्च होतात.

*खर्च वजा जाता सरासरी ६ ते साडेसहा लाखांचं निव्वळ नफा होतो.

 

जनार्दनरावांनी केलेल्या प्रयोगानंतर या भागातील अनेक शेतकरी करवंदांचं उत्पादन घेत आहेत. तर याच गावातील प्रभाकर टेकर या शेतकऱ्यांना करवंदांची रोपवाटीकाही सुरु केली आहे.

 

जिथं बहुतांश शेतकरी सोयाबीन आणि कापूस पिकाशिवाय इतर पिकाकडं वळत नाहीत. त्याच यवतमाळ जिल्ह्यातील जनार्दनरावांनी २० वर्षापूर्वी जंगली झाडाला माणसात आणलं. त्याला व्यावसायिक रुप दिलं. त्यांच्या या प्रयोगशीलतेमुळं पुसद तालुक्यातील अनेक शेतकरी करवंदाचा पीक म्हणून विचार करत आहेत आणि आपलं अर्थकारण सुधारण्याकडं पाऊलं टाकत आहेत.