मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला 'वर्षा' बंगल्यावर दाखल झाले आहेत. राज आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचं कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.
मंगळवारी रात्री उशिरा राज आणि फडणवीस यांची भेट ठरली. त्यानुसार सकाळी 9 वाजता राज ठाकरे मुंबईतील देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानी दाखल झाले. मात्र या भेटीचं कारण दोघांपैकी कोणाकडून स्पष्ट करण्यात आलेलं नाही.
राज ठाकरे यांच्यासोबत मनसेचे नेते शिशिर शिंदे, बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकरही सोबत असल्याची माहिती आहे. राज ठाकरे आणि फडणवीसांची गेल्या दोन महिन्यातील ही तिसरी भेट आहे.
भेटीचं कारण गुलदस्त्यात असलं तरी त्याला राजकीय रंग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.
मंगळवारीच मनसे नेते बाळा नांदगावकर राष्ट्रवादी नेते अजित पवारांच्याही भेटीला गेले होते. मात्र ही भेट कौटुंबिक असल्याचं स्पष्टीकरण नंतर देण्यात आलं.