ते म्हणाले की, प्राथमिक कशाला द्यायची हे ठरवावं लागेल. हा केंद्रीय अर्थसंकल्प नोकऱ्या निर्माण करणारा अर्थसंकल्प आहे. फाईव्ह ट्रिलीयन इकॉनोमी कशी होणार याचा मास्टर प्लँन या बजेटमध्ये आहे. 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न नक्की दुप्पट करू. 2023 पर्यंत मुंबई दिल्ली महामार्ग पूर्ण होणार असल्याचे देखील ते म्हणाले.
नवदशकात भारताला नवभारताकडे नेणारा सुधारणावादी अर्थसंकल्प : देवेंद्र फडणवीस
नव्या दशकाकडे वाटचाल करताना आधुनिकतेची कास धरत भारताला नवभारताकडे नेणारा हा सुधारणावादी अर्थसंकल्प आहे. याचे मी मनापासून स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. शेती आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर मुळापासून उपचाराचा प्रयत्न यातून करण्यात आला आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आणि कृषी विकासातील अडथळे दूर करण्यासाठी उत्पादन, कृषी मालाची वाहतूक, बाजारपेठ, निर्यात अशा सर्वच बाबतीत ठोस निर्णय घेण्यात आले आहेत, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. किसान रेल आणि कृषी उडान यासारखे निर्णय ऐतिहासिक आणि दूरगामी परिणाम करणारे आहेत. शेतकरी कल्याणासाठी सुधारणावादी कायदे स्वीकारणाऱ्या राज्यांना अधिक प्रोत्साहन देण्याचा मनोदय या नवदशकातील अर्थसंकल्पातून स्पष्टपणे अधोरेखित होतो. सिंचन आणि ग्रामीण विकासासाठी 2.83 लाख कोटी रुपयांची तरतूद हा ग्रामोदयाचा मार्ग अधिक सुकर आणि गतिमान करणारा आहे. जिल्हास्थानी एक्सपोर्ट हब, मुंबई- दिल्ली एक्सप्रेसवे, मुंबई-अहमदाबाद रेल्वे प्रकल्प, नव्या रेल्वे, पोर्ट, 100 नवे विमानतळ यासारख्या पायाभूत सुविधा प्रकल्पातून भारताच्या आर्थिक विकासाचा अध्याय नव्याने लिहिला जाईल, असंही फडणवीस म्हणाले.
समाजाच्या सर्व घटकांची काळजी घेणारा सर्वंकष अर्थसंकल्प : चंद्रकांत पाटील
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या सूत्रानुसार देशाची अर्थव्यवस्था बळकट करतानाच शेतकरी, महिला, युवा, अनुसूचित जाती, आदिवासी, व्यापारी, नोकरदार अशा सर्वांच्या कल्याणासाठी तरतूद करणारा सर्वंकष अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला असून या अर्थसंकल्पाचे स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठीची सोळा कलमी योजना, प्रत्येक घराला पिण्याचे पाणी मिळण्याच्या पंतप्रधानांच्या निर्धारासाठी भक्कम आर्थिक तरतूद, जिल्हा रुग्णालयांना जोडून प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याची कल्पक योजना, इन्कम टॅक्समध्ये कपात करून मध्यमवर्गीयांना दिलासा, अनुसूचित जाती – जनजाती – ओबीसी यांच्या कल्याणासाठी भक्कम आर्थिक तरतूद ही या अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये आहेत. समाजाच्या आकांक्षा पूर्ण करणे, देशाची अर्थव्यवस्था भक्कम करणे आणि दुर्बल घटकांची काळजी घेणे यावर या अर्थसंकल्पाचा भर आहे. त्यांनी सांगितले की, देशात पायाभूत सुविधांच्या विकासाला जोरदार चालना देण्यासाठीची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. नव्या युगातील तंत्रज्ञानाचा आणि व्यावसायिक वातावरणाचा देशाला पुरेपूर लाभ व्हावा यासाठीही या अर्थसंकल्पात उपाय केले आहेत. बँकांतील ठेवींचे विमा संरक्षण एक लाखावरून वाढवून पाच लाख रुपये करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. कररचना सोपी करणासाठीची पावले आणि करदात्याच्या हक्कांची नोंद घेणे ही या अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये आहेत. एकूणच भारताची अर्थव्यवस्था भक्कम करून आर्थिक विकासाची नवी उंची गाठण्यासाठीची पावले या अर्थसंकल्पात आहेत.
अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे की, हा अर्थसंकल्प कृषी, सिंचन आणि ग्रामीण विकास यावर भर देणारा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पामुळे देश प्रगतीपथावर जाईल, असं त्यांनी म्हटलं आहे.
योजनांचा फायदा गोव्याला होईल : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत
सबका साथ,सबका विकास, सबका विश्वास या सूत्रावर आधारित केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प मांडला असून त्याचे आम्ही स्वागत करतो. पर्यटन आणि मासेमारी क्षेत्रासाठी हाती घेतलेल्या योजनांचा फायदा गोव्याला होईल यात दुमत नाही, अशी प्रतिक्रिया गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे. मध्यमवर्गीय करदात्यांना दिलेला दिलासा ही अत्यंत महत्वपूर्ण बाब आहे. अनुसूचित जाती आणि जमातीसाठी केलेल्या आर्थिक तरतूदीचा फायदा गोव्यातील समाजासाठी करून त्यांचा विकास साधण्यास मदत होणार आहे, असे सावंत म्हणाले.