नवी मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर नियमाचे उल्लंघन करणाऱ्या एसटी महामंडळाच्या 342 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. महामार्ग पोलीस पळस्पे केंद्र आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मुबंई यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली. राज्यात प्रथमच नियमाला बगल देणाऱ्या एसटी चालकांवर ई-चलानद्वारे कारवाई केली आहे. यामध्ये वेग मोडून गाडी चालवणे, फोनवर बोलणे, महामार्गावर लेनची शिस्त न पाळणे याचा समावेश आहे.


मुंबई-पुणे महामार्ग सध्या होणाऱ्या तेथे अपघातांमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. नुकतेच सिनेअभिनेत्री शबाना आझमी मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाल्या होत्या. तसेच या अपघातापूर्वी पुण्याकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या केमिकलने भरलेल्या टँकरने कंटेनर चालकाला ओव्हरटेक करताना कंटेनरला मागून जोरात धडक दिली होती. यामध्ये केमिकलने भरलेला टँकर जळून खाक झाला होता. तर कंटेनरचा मागील बाजू देखील आगीच्या विळख्यात सापडला होता. या दोन्ही अपघातामुळे महामार्गावर चालताना अवजड वाहन चालक शिस्तीचे पालन करतात का, हा प्रश्न उपस्थित झाला होता.


त्यानुसार महामार्गावर चालणारे अवजड वाहने, खासगी बस, एसटी चालक डाव्या मार्गिकेतून न जाता उजव्या मार्गिकेतून चालतात. त्यामुळे छोटी वाहने ओव्हरटेक करताना डाव्या बाजूने जातात आणि याच वेळी अनेक अपघात झाल्याचं दिसून आलं आहे. अवजड वाहने, बस यांनी मार्गिकेचे नियम पाळले तर हे अपघात कमी होतील, असा विश्वास महामार्ग पोलीस व्यक्त करत आहेत.


अवजड वाहने नियमाचे उल्लंघन करताना दिसून आले आहे. या चालकांमध्ये जनजागृती करण्यासाठी महामार्ग पोलिसांनी आतापर्यंत दोन लाख माहिती पत्रके वाटली, मात्र बस आणि अवजड वाहने शिस्तभंग करताना दिसून आले आहेत. यामध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसचा सहभाग मोठ्या प्रमाणात आहे. त्यानुसार महामार्ग पोलीस पळस्पे केंद्र आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी यांनी एक्स्प्रेसवेवर कारवाई करण्यास सुरवात केली.


विशेष मोहीम राबवून महामार्गावर लेन कटिंग, मोबाईलवर बोलणे, अतिवेगाने गाडी चालवने, आणि गाडीत गाणी ऐकणे या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या बसेसवर संयुक्तरित्या कारवाई करण्यात आली आहे. एसटी महामंडळाच्या वाहन चालकांवर कारवाईमुळे महामंडळात भीतीचे वातावरण पसरलं आहे. पहिल्यादा ही मोठी करवाई करण्यात आली आहे. कारवाई दरम्यान कारवाईमधील दंड हा ई-चलानद्वारे घेण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच त्याचे तीन महिने लायसन्स निलंबित करण्यात येणार आहे. यामध्ये कारवाई झालेल्या एसटी महामंडळाच्या शिवनेरी, शिवशाई, विठाई, हिरकणी आणि इतर बसेसचा सहभाग आहे.