रखडलेल्या स्व. गोपीनाथ मुंडेंच्या स्मारकासाठी निधी देण्याचं मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन : एकनाथ खडसे
एबीपी माझा वेब टीम | 10 Dec 2019 08:17 PM (IST)
भाजपमध्ये आपण नाराज नसल्याचं देखील खडसे यांनी सांगितलं. आज तब्बल पाच वर्षांनंतर खडसे आणि ठाकरे यांच्यात भेट झाली. 20 मिनिटं चर्चा झाल्यानंतर खडसे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मुंबई : पाच वर्षांपूर्वी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचं स्मारक औरंगाबादमध्ये उभारण्यासाठी जागा देखील उपलब्ध करुन दिली होती. मात्र मी मंत्रिमंडळाबाहेर आल्यानंतर हे स्मारक रखडलं आहे. या स्मारकासाठी ठाकरे यांना विनंती केली असल्याचं एकनाथ खडसे यांनी उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर सांगितलं. मुख्यमंत्री ठाकरे यांनी देखील ही विनंती मान्य केली असून प्राधान्याने गोपीनाथजी मुंडे यांच्या स्मारकासाठी निधी उपलब्ध करुन देऊ असे ठाकरे यांनी सांगितल्याचं खडसे म्हणाले. दरम्यान भाजपमध्ये आपण नाराज नसल्याचं देखील खडसे यांनी सांगितलं. आज तब्बल पाच वर्षांनंतर खडसे आणि ठाकरे यांच्यात भेट झाली. 20 मिनिटं चर्चा झाल्यानंतर खडसे यांनी माध्यमांशी संवाद साधला. गोपीनाथ मुंडेंच्या स्मारकावरुन भाजपला घरचा आहेर खडसे म्हणाले की, 12 तारखेला गोपीनाथगडावर स्वाभिमान मेळाव्याचे आयोजन केले आहे. दरवर्षी आम्ही या मेळाव्याला जातो. यावर्षी देखील आम्ही यासाठी सर्वजण उपस्थित राहणार आहोत. मी मंत्री असताना पाच वर्षांपूर्वी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचं स्मारक औरंगाबादमध्ये उभारण्यासाठी जागा देखील उपलब्ध करून दिली होती. मात्र मी मंत्रिमंडळाबाहेर आल्यानंतर हे स्मारक रखडलं आहे. या स्मारकासाठी फार खर्च येणार नाही. 30 ते 40 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या स्मारकासाठी मी उद्धव ठाकरे यांच्याकडे विनंती केली की, आपल्या कार्यकाळामध्ये हे स्मारक पूर्ण व्हावं. या संदर्भात आपण घोषणा करावी, अशी विनंती ठाकरे यांना केली असल्याचं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री ठाकरे यांनी देखील ही विनंती मान्य केली आहे. त्यांनी प्राधान्याने गोपीनाथजी मुंडे यांच्या स्मारकासाठी निधी उपलब्ध करून देऊ आणि औरंगाबादच्या दौऱ्यात स्मारकाच्या जागेला देखील भेट देऊ, असे ठाकरे यांनी सांगितलं असल्याचं खडसे यांनी सांगितलं. VIDEO | पाहा काय म्हणाले एकनाथ खडसे सिंचन योजनांसाठी मंत्रिमंडळाच्या शिफारशीसाठी चर्चा खडसे यांनी सांगितलं की, काल दिल्लीमध्ये शरद पवार यांच्याशी माझी अर्धा तास चर्चा झाली. या चर्चेमध्ये माझ्या मतदारसंघातील सिंचन योजनांसाठी मंत्रिमंडळाच्या शिफारशीसाठी त्यांनी मदत करावी यासाठी चर्चा केली. आज उद्धव ठाकरे यांच्याकडे देखील याच सिंचन प्रकल्पाविषयी चर्चा केली. ठाकरे यांनी या प्रकल्पाला मदत करण्याविषयी आश्वासन दिले आहे, असं खडसे यांनी सांगितलं. मी नाराज आहे, ही बातमीच मुळात खोटी मी नाराज आहे, ही बातमीच मुळात खोटी आहे. माझी मनधरणी करण्यासाठी सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे आले यात देखील काही तथ्य नाही. आम्ही गेली अनेक एकत्र आहोत. आल्यानंतर राजकीय चर्चा होतेच. त्यामुळं नव्यानं आलेलं सरकार आणि आपलं सरकार का आलं नाही याबाबत आमची चर्चा झालेली आहे, असे खडसे यावेळी म्हणाले. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांसोबत आम्ही अनेक वर्षांपासून राजकारणात सोबत असल्याने या पक्षांमधील अनेक नेत्यांशी आमची जवळीक आहे. ते आमच्याशी बोलतात. प्रत्येकाला स्वाभाविक असं वाटतं की, राजकीय जीवनात 40-42 वर्ष असलेला कार्यकर्ता आपल्या पक्षात आला तर पक्षाला बळकटी येऊ शकेल. त्यांनी अशा अपेक्षा व्यक्त करणं गैर नाही. परंतु याबाबत मी कुठलाही निर्णय घेतलेला नाही, असेही खडसे यांनी स्पष्ट केलं. हे ही वाचा - भाजपमधल्या 'या' नेत्यांच्या गाठीभेटी का वाढल्या?