भिवंडी महापालिकेत महापौर आणि उपमहापौर पदासाठी मुंबई उपनगराचे जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी दुपारी 12 वाजता ही निवडणूक घेण्यात आली. महापौर पदासाठी कॉंग्रेसकडून रिषिका राका तर भाजप-कोणार्क विकास आघाडीच्या माजी महापौर नगरसेविका प्रतिभा पाटील या रिंगणात होत्या. पीठासीन अधिकारी जोंधळे यांनी हात वर करून मतदान घेतले. या मतदान प्रक्रियेत कोणार्क विकास आघाडीसह आरपीआय (एकतावादी), समाजवादी पक्ष आणि भाजप काँग्रेससह नगरसेवकांनी प्रतिभा पाटील यांना मतदान केल्याने त्या 49 मतांनी विजयी झाल्या. तर शिवसेना काँग्रेस युतीच्या नगरसेविका रिषिका राका यांना अवघी 41 मते मिळाल्याने त्यांचा पराभव झाला.
विशेष म्हणजे भिवंडी महापालिकेत काँग्रेसचे एकूण 47 नगरसेवक असून त्यापैकी 18 नगरसेवक कोणार्क विकास आघाडीकडे गेल्याने त्यांचा दारुण पराभव झाला. त्यामुळे काँग्रेस आणि शिवसेनेला सत्तेपासून पायउतार व्हावे लागले आहे. तर उपमहापौर पदाच्या निवडणुकीत सुद्धा भाजप आणि कोणार्क विकास आघाडीने पुरस्कृत केलेल्या काँग्रेसचे नगरसेवक इम्रान खान यांना 49 मते मिळाली. त्यांनी सेनेचे ज्येष्ठ नगरसेवक बाळाराम चौधरी यांचा पराभव केला. चौधरी यांना 41 मते मिळाली. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात अर्थकारण घोडेबाजार झाल्याने काँग्रेसच्या नगरसेवकांनी पक्षाची साथ न देता सरळ भाजप कोणार्क विकास आघाडीला उघडपणे साथ दिली असल्याची चर्चा आहे. त्यामुळे गेल्या अडीच वर्षांपासून सत्तेवर असलेल्या काँग्रेसला जोरदार झटका बसला आहे.
भिवंडी महापालिकेच्या 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत 90 जागांपैकी कॉंग्रेसने 47 जागा मिळवून बहुमत संपादन केले. तर भाजपने 20, शिवसेनेने 12, कोणार्क आघाडी आणि रिपब्लिकन पक्षाने प्रत्येकी चार, समाजवादी पक्षाला दोन आणि एक अपक्ष नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे कॉंग्रेसने 2017 मध्ये शिवसेनेच्या मदतीने काँग्रेसने महापौरपद मिळविले होते. त्याबदल्यात काँग्रेसने सेनेला उपमहापौर पद दिले होते. त्यामुळे भाजप आणि कोणार्क विकास आघाडीला सत्तेपासून दूर राहावे लागले होते. याची सल भाजप कोणार्क विकास आघाडीला होती. त्यामुळे आज झालेल्या निवडणुकीत भाजप कोणार्क विकास आघाडीने काँग्रेसच्या 18 नगरसेवकांना फोडून महापालिकेत सत्ता स्थापन केली आहे. विधानसभेपाठोपाठ राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस आघाडीची वल्गना करणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना भिवंडीतून जोरदार धक्का बसला आहे. त्यामागे खासदार कपिल पाटील, महेश चौगुले आणि विलास पाटील यांची एकत्रित रणनिती कारणीभूत ठरली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दरम्यान कॉंग्रेसच्या वतीने व्हिप जारी करण्यात आला होता. या व्हिपच्या विरोधात जाणाऱ्यांवर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले होते. मात्र आज सकाळपासून दुसरी व्हिप वर्तमानपत्रात तसंच सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्याचंच कारण देत काँग्रेसचे फुटलेल्या नगरसेवकांनी प्रतिभा पाटील यांना मतदान केलं. मात्र दुसरी व्हिप खोटी असल्याचे सांगत काँग्रेसने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.