मुंबई - कडकनाथ कोंबडी घोटाळा प्रकरण आता पुन्हा एकदा चर्चेत येण्याची शक्यता आहे. 13 डिसेंबरला कडकनाथ कोंबडी पालक संघर्ष समितीकडून विधानभवनावर हक्क आणि न्यायाच्या मागणीसाठी धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. 9 डिसेंबरला बेळगावपासून बाईक रॅली काढत या मोर्चाला सुरुवात होणार आहे. तर, 10 तारखेला कोल्हापूर, 11 ला सातारा आणि त्यानंतर 12 डिसेबरला पुण्यात मोर्चा पोहोचणार असून 13 तारखेला विधानभवनावर हा मोर्चा येऊन धडकणार आहे.

यात फसवणूक झालेले शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. महारयत अॅग्रो कंपनीने 6 ते 8 हजार शेतकऱ्यांना गंडा घातला आहे. या घोटाळ्याची व्याप्ती महाराष्ट्रासह पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, केरळ आणि कर्नाटकपर्यंत जाऊन पोहोचल्याचं तक्रारदारांकडून सांगण्यात येतंय. गेल्या सरकारने या प्रकरणाची कुठलीही दखल घेतली नाही. अनेक ठिकाणी या विरोधात तक्रार देणाऱ्या शेतकऱ्यांच्या तक्रारीही पोलिसांनी नोंदवून न घेतल्याचा आरोप या समितीकडून करण्यात येतोय. ठाकरे सरकारकडून शेतकऱ्यांच्या मोठ्या अपेक्षा असून या प्रकरणात ते आम्हाला नक्कीच न्याय मिळवून देतील असा त्यांना विश्वास आहे.

काय आहे कडकनाथ कोंबडी घोटाळा?
सांगली जिल्ह्यात कडकनाथ कुक्कुटपालन ही योजना सुरु करण्यात आली. पैसे गुंतवा, पक्षी पाळा, अंडी आणि कोंबड्या विका, असं या योजनेचं स्वरुप होतं. सुरुवातीला यात मालकास 75 हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागते. पक्षांसाठी लागणारा खाद्यपुरवठा कंपनीकडूनच केला जात होता. यातून तयार होणारे पक्षी आणि अंडी हेसुद्धा कंपनी ठराविक दराने घेऊन जाणार होती. यातून शेतकर्‍याला एका वर्षात पावणे तीन लाख देण्याचं आमिष दाखवण्यात आलं. दरम्यान, गुंतवणुकीत रक्कम दुप्पट, तिप्पट करण्याच्या नावाखाली या कंपनीने कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांतील हजारो शेतकर्‍यांची लूट या कंपनीने केली आहे. गुंतवणूकदारांना परतावा देऊ शकत नसल्याने राज्यातील अनेक कार्यालयांना टाळं ठोकून कंपनीचे संचालक फरार झाले आहेत.

महाराष्ट्र बरोबरच कर्नाटक, तेलंगणा, केरळ, गोवा यासह हजारो शेतकऱ्यांना सुमारे 800 कोटींना महारयत अॅग्रो कंपनीने गंडा घातल्याची शक्यता आहे. याप्रकरणी दोन महिन्यांपूर्वी संस्थापक सुधीर मोहितेसह सहा जणांवर गुन्हा दाखल झाला. यातील तिघांना यापूर्वी पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून मुख्य सुत्रधार सुधीर फरार होता. अटकपूर्व जामिनासाठी त्याने न्यायालयात अर्जही केला होता. या अर्जावर सुनावणी होण्याआधीच आज तो न्यायालयात शरण आला.

संबंधित बातम्या :

कडकनाथ कोंबडी घोटाळा, मुख्य सूत्रधार अखेर जेरबंद

कोहलीने कडकनाथ खावा, कृषी विज्ञान केंद्राचा सल्ला

VIDEO | सांगलीतील कडकनाथ कोंबडी घोटाळ्याप्रकरणी आरोपी गणेश शेवाळेला अटक | ABP Majha