कोल्हापूर जिल्ह्यातील पेठवडगाव येथील अनिल पाटील यांनी दोन एकर जमीन भाडेतत्वावर घेऊन भाजीपाला करण्यास सुरवात केली. आज त्यांच्याकडे गोटखिंडी गावाकडे दोन एकर आणि पेठवडगांव इथं दोन एकरावर कारल्याची लागवड आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात पेठवडगाव इथं दोन एकरात लावलेल्या कारल्याच उत्पादन सुरु झालं आहे. आतापर्यंत 30 टन कारल्याचं उत्पादन मिळालं असून अजून 10 टन अपेक्षित आहे.
अनिल पाटील यांनी 2006 मध्ये बीएपर्यंतच शिक्षण पूर्ण झाल्यानंतर चार एकर वडिलोपार्जित शेतीकडे आपला मोर्चा वळवला. 2014 पर्यंत ऊस शेती केली. मात्र वर्ष- दीड वर्षातून पैसे येत असल्याने त्यांनी 2014 मध्ये संपूर्ण ऊस शेती बंदच करून हंगामी फुलशेती आणि भाजीपाल्याची शेती करण्यास सुरवात केली. वर्षभर कोणता ना कोणता भाजीपाला त्यांच्याकडे असतो. गेल्या तीन वर्षांपासून अनिल हमखास उन्हाळ्यात कारल्याचं पीक घेतात. इतर पिकापेक्षा यामध्ये पैसे चांगले मिळत असल्यानं आता त्यांनी क्षेत्र वाढवण्यास सुरवात केली आहे.
पेठवडगाव येथील दोन एकरातील कारल्याचा प्लॉटमध्ये एकरी 50 हजार रुपये प्रमाणे दोन एकरासाठी एक लाख रुपये देऊन एक वर्षासाठी भाडे तत्वावर जमीन घेऊन त्यामध्ये पहिलंच कारल्याचं पीक घेतलं आहे. सुरवातीला जमिनीची चांगली मशागत करून पाच फुटाण सऱ्या सोडून घेतल्या. सरीत रासायनिक खते घालून बोध तयार करून मल्चिंग पेपर अंथरला. जवळच्या रोपवाटिकेतून यूएस 33 या जातीच्या कारल्याची 7 हजार रोपे, तीन रुपयाला एक याप्रमाणे आणली. बोधावर अडीच फुटावर एक याप्रमाणे 20 एप्रिलला रोपे लावली.
रोप लावल्यानंतर सुरवातीला ह्युमिक अॅसिड, 12:61:0, 19:19:19 यांची आळवणी घेतली. 10 दिवसानंतर ठिबकमधून एक दिवसाआड रासायनिक विद्राव्य खत देण्यास सुरवात केली. प्लॉटमध्ये 10 मे रोजी तारकाठी करून घेतली आणि वेलांची जसजशी वाढ होईल तसे वेल तारकाठीवर चढविण्यात आले कीड आणि रोगाच्या नियंत्रणासाठी गरजेनुसार फवारण्या घेण्यात आल्या.
सात जूनला कारल्याची पहिली तोडणी घेतली. यावेळी 300 किलो कारल्याच उत्पादन मिळालं. प्रत्येक तीन दिवसाच्या अंतराने काढणी करण्यात येते. काढलेली फळे वाहतूक करून शेडमध्ये आणून ढीग केला जातो. आकारमानानुसार प्रतवारी करून 35 किलो एका बॉक्समध्ये भरून वाशी मार्केटला बॉक्स पाठवले जातात. 2 एकरात लावलेल्या कारल्याच आतापर्यंत पंधरा तोड्यात 30 टन कारल्याचं उत्पादन मिळालं असून अजून 10 टन अपेक्षित आहे.
कारल्याला सरासरी 30 रुपये किलोप्रमाणे दर मिळाला असून आतापर्यंत विक्रीतून नऊ लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. जमिनीची भाडे पट्टी एक लाख रुपये, खते, रोपे, मशागत, मजुरी, औषधे, तारकाठी असा सर्व मिळून पाच लाख खर्च आला असून खर्च वजा जाता चार लाख उत्पन्न मिळाले.
अजून एक महिना प्लॉट सुरु राहणार असून दर जर असाच टिकून राहिला तर अजून 3 लाख रुपये अपेक्षित आहेत.
पूर्वी इतकं कारल्याला मार्केट नव्हतं आता मात्र ते वाढलं आहे. याचाच फायदा उचलत अनिल पाटील कारल लागवडीकड वळले आणि कडू कारल्यानं त्यांच्या जीवनात गोडी आणली.