Bhandra Agriculture News : शेतकऱ्यांसमोर सातत्यानं नवनवीन संकट येत असतात. संकटावर मात करुन शेतकरी चांगले उत्पादन घेत आहेत. शेतकरी सातत्यानं शेतात नवनवीन प्रयोग करत आहेत, तर कुठे पारंपारिक शेतीला फाटा देत आधुनिक पद्धतीनं शेती करत आहेत. भंडारा (Bhandra) हा तांदूळ (Rice) उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र, आता पारंपारिक पिकाला बगल देत या भंडारा जिल्ह्यातील शेतकरी केळीचं विक्रमी (Banana) उत्पादन घेत आहेत.  केळीच्या पिकातून एकरी तीन ते चार लाखांचा नफा मिळत आहे.  


राज्यात भंडारा हा जिल्हा भात पिकासाठी प्रसिद्ध आहे. किंबहुना येथील उच्च प्रतीच्या तांदळाला भारतातच नव्हे तर परदेशातही मोठी मागणी असते. अशा भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील कोलारी (पट) येथील शेतकरी मोरेश्वर सिंगनजुडे यांनी पारंपरिक भात पिकाची शेती न करता आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालत बागायती शेतीतून केळीचे विक्रमी उत्पादन घेतलं आहे. केळीच्या पिकातून त्यांनी आर्थिक प्रगती साधली आहे. 


चार एकर क्षेत्रावर केळीची बाग 


मोरेश्वर सिंगनजुडे यांच्याकडे वडिलोपार्जित आठ एकर शेती आहे. या शेतीत ते पारंपरिक भात पिकाची शेती करत होते. मात्र, निसर्गाचा लहरीपणा आणि व्यापारी यांच्या चक्रव्यूहात सापडल्यानं त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत होता. यामुळं मोरेश्वर सिंगनजुडे यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन केळीची शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सुरुवातीला दोन एकरात प्रायोगिक तत्त्वावर केळी पिकाची लागवड केली. त्यात त्यांना मोठा आर्थिक लाभ झाल्यानं आता चार एकर क्षेत्रावर त्यांनी केळीची लागवड करून विक्रमी उत्पादन घेतले आहे. 


तांदूळ पिकापेक्षा चार पट अधिक नफा 


मोरेश्वर  यांनी बागायती शेतीला जोड म्हणून आंतरपीक घेतले आहे. यातून पिकाला लागणारा खर्च त्यातून निघतो. त्यांना केळीचा नफा एकरी तीन ते चार लाखांच्या आसपास मिळतो. हा नफा म्हणजे तांदूळ पिकातून मिळणाऱ्या नफ्यापेक्षा सुमारे चार पट अधिक आहे. मोरेश्वर सिंगनजुडे यांनी केळीची लागवड केली त्यावेळी अनेकांनी त्यांची टिंगल केली. मात्र, कधीही न खचता एकाग्रतेने त्यांनी शेतीकडे लक्ष दिले. आता परिस्थिती बदलली असून परिसरातील अनेक शेतकरी मोरेश्वर सिंगनजुडे यांचा सल्ला घेत आहेत. कित्येक जणांनी आधुनिकतेची सांगड घालत केळी आणि नावीन्यपूर्ण पिकांसह बागायती शेती करण्याकडं कल वाढवला आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Banana Farming : केळी उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस; अडीच हजार रुपये प्रति क्विंटल दराने केळीची विक्री