भंडारा: दोन दिवस भंडारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळला आणि या पावसामुळे जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या पावसामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र आहे. अनेक ठिकाणी शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. असं असताना भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार डॉ. प्रशांत पडोळे हे पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर असताना गाडीच्या बोनेटवर बसून त्यांनी स्टंटबाजी केल्याचा प्रकार समोर आला आहे


खासदाराचा बोनेटवर बसून रील बनवण्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. पूरपरिस्थितीने नागरिक त्रस्त झालेले असताना खासदाराचा हा रील समोर आल्यानं आता खासदाराप्रती रोष व्यक्त होत आहे. मोटर वाहन कायद्याचा भंग करणाऱ्या खासदार प्रशांत पडोळे यांच्यावर कारवाई कोण करणार? असा प्रश्न देखील आता नागरिक उपस्थित करीत आहे.


डॉ. प्रशांत पडोळे यांचं रिल सोशल मिडीयावर व्हायरल


मतदारसंघात एकीकडे पावसामुळे नागरिकांचे हाल होत आहे, मोठं नुकसान झालं आहे, जनजीवन विस्कळीत झालं असताना आपला खासदार आपल्या समस्या सोडवण्यापेक्षा हे रील करत आहेत, याबाबत काहींनी संताप व्यक्त केला आहे. तर हे रील सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसत आहे. प्रशांत पडोळे यांनी पुरभागात स्टंटबाजी केल्याने त्यांच्यावर विरोधी पक्ष देखील टीका करण्याची शक्यता आहे. पडोळे हे पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर असताना गाडीच्या बोनेटवर बसून त्यांनी स्टंटबाजी केली आहे.






भंडारा जिल्ह्यातील ५० गावांचा संपर्क तुटला


दोन दिवस झालेल्या संततधार पावसामुळे विविध प्रकल्पांतून वैनगंगेत पाणी सोडण्यात आले आहे.त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. वैनगंगेने धोक्याची पातळी ओलांडल्याने सुमारे ५०हून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. बावनथडी नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने महाराष्ट्राचा मध्य प्रदेशशी संपर्क तुटला आहे.


कोण आहेत खासदार डॉ. प्रशांत पडोळे?


विदर्भामध्ये सहकार महर्षी म्हणून ओळख असलेल्या दिवंगत यादवराव पडोळे यांचे डॉ. प्रशांत यादोराव पडोळे सुपत्र आहेत. प्रशांत पडोळे यांची राजकीय क्षेत्रामध्ये वेगळी अशी ओळख नाही. त्यांनी उच्च वैद्यकीय शिक्षण युक्रेन येथे घेतल्यानंतर ते भंडाऱ्यात स्थायिक झाले. २००५ पासून भंडारा जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यात वैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांनी काम केलं आहे. तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये देखील सक्रिय असल्याचं बोललं जातं.


राजकीय क्षेत्रामध्ये त्यांनी २००५ साली प्रवेश केला. भंडारा जिल्हा दुग्ध संघाची निवडणूक लढून त्यांनी संचालक म्हणून काम सुरू केलंं. पडोळे यांनी २०१४ मध्ये शिवसेनेच्या तिकीटावर साकोली विधानसभेची निवडणूक लढवली पण त्या निवडणुुकीत त्यांचं डिपॉझिट जप्त झालं. लोकसभा निवडणूक लढवण्याच्या अनुषंगाने त्यांनी जिल्ह्यात संपर्क वाढवला. भाजपचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या मतदारसंघातून त्यांनी भाजपचा पराभव करून खासदारकी मिळवली आहे.