भंडारा: राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकणाऱ्याला एक लाख रुपयांचं बक्षीस देणार असल्याचं राजरत्न आंबेडकर (Rajratna Ambedkar)  यांनी जाहीर केलं. राजरत्न आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू आहेत. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथे आयोजित धम्म संमेलनात त्यांनी ही घोषणा केली. 


डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी (Chandrakant Patil) आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर (Rajratna Ambedkar) यांनी चांगलाच खरपूस समाचार घेतला. राजरत्न आंबेडकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले की, "डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सूर्यासारखे आहेत आणि जर सूर्यावर थुंकायचा प्रयत्न केला तर ती थुंकी त्याच्याच तोंडावर पडते. मला वाटते काल परवा ती थुंकी काळ्या शाईच्या रुपात चंद्रकांत पाटलाच्या तोंडावर पडली."


राजरत्न आंबेडकर यांनी राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला. तसेच त्यांनी पाटील यांच्या तोंडावर शाई फेकण्याच्या कृत्याचे समर्थन केलं. समता सैनिक दलाच्या सैनिकाचे कौतुक करून त्यांना एक लाखांचे बक्षीस जाहीर केले.


काय आहे प्रकरण?


शाळा चालवण्यासाठी सरकारच्या मदतीवर अवलंबून राहू नका, बाबासाहेब डॉ. आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटलांनी भीक मागून शाळा सुरू केल्या असं वक्तव्य राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. त्यानंतर त्यांच्या या वक्तव्याचा अनेक स्तरातून निषेध व्यक्त करण्यात आला. त्यातूनच पिंपरी चिंचवडमध्ये चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकण्यात आली होती. 


राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या चेहऱ्यावर शाई फेकणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. मनोज भास्कर घरबडे (समता सैनिक दल संघटक), धनंजय भाऊसाहेब इचगज ( समता सैनिक दल सदस्य) आणि वंचित बहुजन आघाडीचे सचिव विजय धर्मा ओव्हाळ या तिघांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. मनोज गरबडेनं चंद्रकांत पाटील यांच्या तोंडावर शाई फेकली आणि तिथं घोषणाबाजी देखील केली. त्यानंतर पोलिसांनी लगेच त्याला ताब्यात घेतलं. अटक करण्यात आलेल्या तिघांवरही 307 सारखा गंभीर गुन्हा दाखल करून राजकीय द्वेशातून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला गेल्याचा आरोप त्यांच्या वकिलांनी केलाय. 


चंद्रकांत पाटलांकडून दिलगिरी व्यक्त 


डॉ. बासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. आणि पिंपरी-चिंचवडमधील शाईफेक प्रकरणातील कारवाई मागे घेण्याच्या सूचना केल्या आहेत.