Bhandara News : गोसेखुर्द प्रकल्पाच्या (Gosekhurd Dam) उजव्या कालव्यात नागपुरातील दोन तरुण वाहून गेल्याची घटना भंडारा (Bhandara) जिल्ह्याच्या पवनी इथे घडली आहे. आंघोळीसाठी कालव्यात उतरले असता एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात दोघेही वाहून गेल्याचं सांगण्यात येत आहे. त्यापैकी एकाचा मृतदेह काही अंतरावर आढळून आला. तर दुसऱ्या तरुणाचा शोध सुरु आहे. विशेष म्हणजे तरुण बुडण्याची आठवड्यातील ही दुसरी घटना आहे.
नईम खान लाल खान (वय 22 वर्षे) आणि अमिन शहा लाल शहा (वय 22 वर्षे) दोघे रा. अब्बुमियानगर, भांडेवाडी, नागपूर अशी वाहून गेलेल्या तरुणांची नावे आहे. हे दोन्ही तरुण गावोगावी जाऊन कापड विक्रीचा व्यवसाय करतात. हे दोघे मूळचे मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर इथले रहिवासी असून मागील काही दिवसांपासून कापड व्यवसायाच्या निमित्ताने ते नागपुरात राहत होते. उपजीविकेचं साधन म्हणून गावोगावी जाऊन कपडे विक्री करत होते.
काय आहे संपूर्ण घटना?
एका व्हॅनने चार तरुण पवनी इथे कापड विक्रीसाठी आले होते. त्यापैकी दोन तरुणांना आंघोळीसाठी पाण्यात उतरण्याचा मोह झाला. नईम खान आणि अमिन शाह हे निलज मार्गावरील गोसेखुर्द उजव्या आंघोळीसाठी पाण्यात उतरले. मात्र यापैकी एक जण पाण्यात बुडायला लागला. त्याला वाचवण्यासाठी दुसरा तरुण गेला. मात्र कालव्यातील पाण्याचा प्रवाह वेगाने असल्याने दोघेही वाहून गेले. हा प्रकार व्हॅनमध्ये बसून असलेल्या त्यांच्या दोन साथीदारांच्या लक्षात आला. त्यांनी तात्काळ पवनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पवनी पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि शोध सुरु केला. परंतु तोपर्यंत उशिर झाला होता. दोन तरुणांपैकी एकाचा मृतदेह काही अंतरावर आढळून आला तर दुसऱ्याचा शोध अद्याप सुरु आहे.
भंडाऱ्यात तीन तरुणांचा तलावात बुडून मृत्यू
दरम्यान भंडारा जिल्ह्यात तलावात बुडून तीन युवकांचा मृत्यू झाल्याची घटना 29 ऑगस्ट रोजी संध्याकाळच्या सुमारास उघडकीस आली होती. 18 ते 20 वर्षे वयोगटातील युवकांचा तलावात बुडून मृत्यू झाला. प्रशासनाने तिघांचेही मृतदेह तलावातून बाहेर काढले. पवनी तालुक्यातील अत्री या गावात ही घटना घडली. हे युवक या तलावात नेमके कशासाठी गेले होते याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. तसंच तलावाजवळच्या ग्रामस्थांना सायकल तसंच त्यांचे कपडे आढळले नाहीच. शिवाय हे तीनही युवक बेपत्ता असल्यामुळे ते तलावात बुडाले असावे असा कयास ग्रामस्थांनी लावला. त्यानुसार शोधमोहीम हातात घेण्यात आली आणि या तिन्ही युवकांचे शव बाहेर काढण्यात आले. योगीराज मेश्राम, नरेश रामटेके आणि बालक रंगारी अशी मृत तरुणांची नावं असून त्यांच्या मृत्युने अत्री गावात शोककळा पसरली.