Bhandara News: भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील खातखेडा इथं वाघानं हल्ला केल्यान ईश्वर मोटघरे (62) यांचा मृत्यू झाला होता. ही घटना बुधवारी सकाळी घडली. यानंतर गावात पोहचलेल्या वनाधिकाऱ्यांवर संतप्त ग्रामस्थांनी प्राणघातक हल्ला केला. यात सहायक वनसंरक्षक यांच्यासह दोन वन कर्मचारी गंभीर जखमी झालेत. तर, वाघाला बघण्यासाठी गेलेल्या एका तरुणावर वाघानं हल्ला करून गंभीर जखमी केलं. ग्रामस्थांच्या हल्ल्यात जखमी झालेले तीन वनाधिकारी आणि वाघाच्या हल्ल्यातील एक ग्रामस्थ अशा चौघांना उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आलं आहे.
वाघाच्या हल्ल्यात ईश्वर मोटघरे (62) यांचा मृत्यू झाला. तर, निखिल गुरुदास उईके (22) रा. नांदीखेडा हा तरुण गंभीर जखमी झाला. ग्रामस्थांच्या हल्ल्यात सहायक वनसंरक्षक यशवंत नागुलवार (57), शैलेश देवेंद्रप्रसाद गुप्ता (56), दिलीप वावरे (52) हे गंभीर जखमी झालेत. या गंभीर चौघांना पवनी येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना पुढील उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आलं आहे. पवनी तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या खातखेडा हे गाव जंगल व्याप्त परिसरात आहे. तीन दिवसांपूर्वी या परिसरातीलच गुडेगाव या गावातील एका वाघानं हल्ला करून ठार केलं होतं. तेव्हापासून या परिसरातील ग्रामस्थांनी वाघाचा तातडीनं बंदोबस्त करावा, अशी मागणी रेटून धरली होती. मात्र, वाघाच्या बंदोबस्तापूर्वीच बुधवारला सकाळी पुन्हा एकदा वाघानं हल्ला करून इसमाला ठार केले.
या घटनेनंतर पंचक्रोशीतील गावातील नागरीक घटनास्थळी पोहोचले. या घटनेची माहिती होताच वनविभागाचे अधिकारी आपल्या पथकासह खातखेडा गावात पोहोचले. यावेळी ग्रामस्थांच्या संतापाला वनाधिकाऱ्यांना सामोरे जावे लागले. संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी वनाधिकाऱ्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात सहाय्यक वनसंरक्षक यशवंत नागुलवार हे गंभीर जखमी झालेत. तर अन्यही गंभीर जखमी झालेत. दरम्यान, ग्रामस्थांचा रोष बघता वनाधिकारी मिळेल त्या दिशेने सैरावैरा पळाले.
घटनेची माहिती होताच, जिल्ह्यातील संपूर्ण वनपरिक्षेत्राधिकारी त्यांचे पथक, नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची रॅपिड ॲक्शन टीम दाखल झाली. पोलिसांचा तगडा बंदोबस्त गावात तैनात करण्यात आला. ग्रामस्थांचा रोषाला सामोरे जावे लागल्यानंतर वनाधिकाऱ्यांनी ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीनं वाघाचा शोध घेत त्याला ट्रँग्यूलाईज करून सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास जेरबंद केलं. वाघाला जेरबंद केल्यानंतर ग्रामीण ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
सध्या खरीप हंगामाची लगबग सुरू आहे. यामुळं या वाघाच्या हल्ल्यानं शेतकऱ्यांसह ग्रामस्थांमध्ये मोठं भीतीचं वातावरण पसरलं होतं. वाघ जेरबंद झाला असला तरी, आता वनाधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या ग्रामस्थांना पोलीस कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.