Bhandara News Maharashtra Udpates: तुम्ही शाळेत असताना तुमच्या मित्र-मैत्रिणींची एकसारखी आडनावं तुम्ही ऐकली असणार... त्यावरून शाळेत अनेकदा हजेरीचा आणि नावांचा गोंधळ झालेला पाहिला असेल. पण गावातील सगळ्याच लोकांचं आडनाव सारखंच. नुसतं आडनावच काय तर त्यांची जात आणि व्यवसायही सारखाच असेल तर? ही बातमी कोणत्या सिनेमाची स्टोरी नव्हे, तर भंडाऱ्यातील पन्नाशी गावातील खरीखुरी कहाणी आहे (Pannasi Village Pauni Tahsil of Bhandara Story) 


भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील डोंगराच्या पायथ्याशी जंगलव्याप्त भागात वसलेलं पन्नाशी हे गाव. गावाच्या नावाप्रमाणेच या गावात पन्नासच घरं आणि या गावात सर्वांची एकच आडनावं कशी हा प्रश्न आपणास पडला असेल. पण हे सत्य आहे. या गावात सर्वच नागरिक शेंडे आडनावाचे वास्तव्यास आहेत. 


Same Surname in Pannasi Village: गावातील प्रत्येक व्यक्तीचं आडनाव शेंडे


दीडशे वर्षापूर्वी या गावात एक कोसरे माळी समाजाचे शेंडे कुटूंबीय राहण्यासाठी आले. त्यांनी हळूहळू आधी फुलशेती फुलवली आणि त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयातील आणखी काही परिवार येथे राहण्यासाठी आलेत. त्यामुळे गावात सर्व शेंडे आडनावाचे 50 कुटुंब तयार झाली. आता 150 नागरिक वास्तव्य करू लागलेत, तेही एकच आडनावाचे. आता शेंडे कुटुंबं भाजीपाला शेतीसह फुलशेतीकडे वळले आहेत.


Zero Crime Rate in Pannasi Village: पन्नाशी गावात गुन्हेगारीचं प्रमाण शून्य


आता हे शेंडे परिवारातील नागरिक पन्नाशी गावात मोठ्या गुण्यागोविंदाने नांदत आहेत. एकमेकांच्या सुख-दु:खात मोठ्या सहभागी होत आहेत. कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम एकत्रित येत मोठ्या उत्साहाने साजरे करतात. नागरिकांच्या सांगण्यानुसार गावात कधीही भांडण-तंटे झाले नसल्याची माहिती आहे. यावरच या छोट्याशा गावाची महती थांबत नाही तर, गावातील सर्वच नागरिक भाजीपाल्याची शेती करीत असून येथील भाजीपाला संपूर्ण भंडारा जिल्ह्यात प्रसिध्द आहे. या गावातील नागरिकांनी कोरोनाला आपल्या गावातील वेशीपर्यंतसुद्धा येऊ दिले नाही.


Pannasi Village Story: राज्याने आदर्श घ्यावा 


जर राज्यातील प्रत्येक गावातील नागरिक पन्नाशी या छोट्याशा गावातील नागरिकांप्रमाणे गुण्यागोविंदाने भांडण तंटे न करता राहिले तर पोलीसांचा ताण नक्कीच कमी होईल. तेव्हा राज्यातील प्रत्येक गावाने पन्नाशी या गावाचा आदर्श नक्कीच घ्यायला हवाच.


ही बातमी वाचा: