भंडारा : वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळं भंडारा (Bhandara) शहरातील पाणीपुरवठा (Water Supply) करणारा फिल्टर प्लांट पाण्याखाली आला आहे. त्यामुळे भंडारा शहराचा पाणीपुरवठा पुढील दोन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबत नगरपालिका प्रशासनानं सूचना दिली आहे. तर, जिल्हा सामान्य रुग्णालयात होणारा पाण्याचा पुरवठाही बंद करण्यात आला आहे.शहरातील नागरीक आणि रुग्णालयातील रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांची पाण्यासाठी वणवण होऊ नये, म्हणून अग्निशमन विभागाच्यावतीने तात्पुराता पाण्याचा पुरवठा करण्याची व्यवस्था करण्यात येईल. रविवार (17 सप्टेंबर) रोजी सकाळपासून शहरातील विविध प्रभागांमध्ये टँकरने पाण्याचा पुरवठा करण्यात येईल. तसेच कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी फिल्टर प्लांटचा वीज पुरवठा बंद करण्यात आलाय.
जिल्ह्याला पुराच्या पाण्याचा वेढा
मध्यप्रदेशातील संजय सरोवर आणि गोंदियामधील धापेवाडा धरणामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे वैनगंगा नदी दुथडी भरुन वाहू लागली. परिणामी गोसीखुर्द धरणाच्या पाणीसाठ्यात देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली. तर वैनगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली असून भंडारा - बालाघाट या आंतरराज्य मार्गासह जिल्ह्यातील 20 पेक्षा अधिक मार्ग बंद करण्यात आले. जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असणाऱ्या बीटीपी भाजी मार्केट समोरून बॅक वॉटर प्रवाहित होतं असल्यानं या परिसरातील मार्ग बंद करण्यात आला.
नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले
या पूरस्थितीचा फटका बसलेल्या अनेक कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. तर, शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली आलीये. जिल्हा प्रशासनाकडून देखील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यानंतर वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आणि भंडारा शहरातील सखल भागामध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली. गोसीखुर्द धरणाच्या 33 दरवाज्यांमधून जवळपास 5 लाख 77 हजार 759 क्युसेस प्रती सेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. त्यामुळे नदी काठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला.
संपूर्ण ऑगस्ट महिन्यात पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शेतकऱ्यांवर दुष्काळाचं संकट घोंघावत होतं. पण आता आलेल्या पुरामुळे देखील शेतपिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. तर शासनान तातडीने पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी सध्या शेतकरी वर्गाकरुन करण्यात येत आहे. हवामान विभागाकडून राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. त्यामुळे पूर्व विदर्भात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावलीये.