भंडारा : भरधाव वेगाने येणाऱ्या एका चारचाकी वाहनाने दोन दुचाकीस्वारांना धडक दिली. या धडकेमध्ये (Accident) दोन्ही दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना भंडाराजवळील खुर्शिपार येथे शुक्रवार (15 सप्टेंबर) रोजी रात्री घडली. या अपघातातील मृत व्यक्तींमध्ये एका लष्करी जवानाचा देखील समावेश आहे. नागेश्वर बालपांडे (वय 34) , हरगोविंद क्षीरसागर (वय 45), विनोद भोंदे (वय 47) असं मृत व्यक्तींची नावे आहेत. नागेश्वर बालपांडे हे बेलगाम इथे भारतीय लष्करात कार्यरक आहेत. तर ते सुट्टीसाठी गावाला आले होते. या अपघातामध्ये चारचाकी वाहनातील दोघेही जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
वाहनांचा वेग जीवघेणा...
या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. यातील नागेश्वर बालपांडे हे सातोना गावामध्ये तर हरगोविंद क्षीरसागर हे पाहुणी आणि विनोद भोंदे हे मोहदुरा या गावामध्ये वास्तव्यास होते. अचानक समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने या तिघांना उडवलं आणि यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. समोरील वाहन हे वेगात असल्याने या तिघेही जण संभ्रमात पडले. त्यामुळे वाहनांचा वेग हा जीवघेणा ठरत असल्याचं चित्र सध्या भंडारा जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. दरम्यान चारचाकी वाहनाची पोलिसांकडून चौकशी देखील करण्यात येत आहे. तर त्या वाहन चालकांवर देखील आता कोणती कारवाई होणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
अपघाताचं सत्र थांबेना
भंडारा जिल्ह्यात अपघाताच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत आहे. रोज अपघाताच्या घटना समोर येत आहेत. त्यामध्ये अनेकांचा नाहक जीव देखील जात आहेत. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी प्रशासनाकडून सर्व पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. अनेक उपाययोजना राबवण्यात येत आहे. मात्र अपघाताच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अपघात कधी थांबतील आणि नागरिक सुरक्षित प्रवास कधी करु शकतील , असा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहे.
काहीच दिवसांपूर्वी भंडारा जिल्ह्यामध्ये एका मुलाच्या खिशातच मोबाईचा स्फोट होऊन तो गंभीर जखमी झाला होता. भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील प्रसिद्ध चांदपूर येथील हनुमान मंदिर परिसरात घडली. या घटनेत चांदपूर येथील 12 वर्षीय प्रीतम किशोर वाघरे हा मुलगा जखमी झाला. मुलाच्या सतर्कतेमुळे जीवितहानी टळली.