Bhandara : खरीप हंगामात (Kharif Season) होणारी शेतकऱ्यांची (Farmers) लूट आणि फसवणूक थांबवण्यासाठी कृषी विभागानं भंडारा जिल्ह्यात आठ भरारी पथकाची नेमणूक केली आहे. या भरारी पथकानं जिल्ह्यातील 600 पेक्षा अधिक कृषी केंद्रांची आतापर्यंत तपासणी केली आहे. जी बियाणे विक्रीसाठी ठेवण्यात आलेली आहेत अशा बियाणांची साठा पुस्तकेत नोंद नसणे, विक्रेत्यांकडे बियाण्यांचे स्त्रोत नसणे, बियाण्या कंपन्यांचा परवाना नसणे आदी कारणांवरुन भंडारा जिल्ह्यात 19 कंपन्यांच्या बियाणांवर विक्री बंदीचं आदेश लागू केले आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या खत आणि औषधांचा मुबलक साठा असल्याची माहिती कृषी विभागाने दिले आहे.


अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक


राज्यात बोगस बियाणे ब्रँडेड कंपन्यांचे नाव वापरून विक्री केले जाण्याचे अनेक प्रकार घडत आहेत. यावर शासनाचे नियंत्रण नाही, त्याचबरोबर कापूस आणि सोयाबीनच्या महाबीज यासारख्या लोकप्रिय बियाणांची अधिकच्या आणि चढ्या भावाने दुकानदार विक्री करत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. याद्वारे शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक तसेच फसवणूक केली जात असल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत.  


बोगस बियाणे-औषधे विक्री करणाऱ्यांविरोधात कडक कायदा करणार


राज्यात बोगस बियाणे, खते, कीटकनाशके यांची विक्री करणाऱ्या काही जणांवर अलीकडे कारवाई झाली आहे, मात्र बोगस बियाणे-औषधे विक्री करणाऱ्यांविरोधातील अधिक कडक कायदा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. तर चालू पावसाळी अधिवेशनातच (Monsoon Session) बोगसगिरी करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याचा अधिक कडक कायदा अस्तित्वात आणला जाईल, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी दिली. 


ज्याप्रमाणे बीटी-कापूस बियाण्यांच्या बाबतीत बोगस बियाणे वितरित करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल होतो, त्याच धर्तीवर तोच कायदा अन्य बियाण्यांच्या, खतांच्या व कीटक नाशकांच्या बाबतीतही लागू करण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले. तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात संपन्न झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला असून, त्यासाठी एक विशेष समितीही स्थापन करण्यात आली असल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.


महत्त्वाच्या बातम्या: