Bhandara Rain : राज्यात काही ठिकाणी चांगलाच पाऊस (Rain) कोसळत आहे. विशेषत: विदर्भात पावसानं धुमाकूळ घातला आहे. भंडारा (Bhandara), गोंदियासह (Gondia), चंद्रपूर (Chandrapur) आणि गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान, संततधार पावसाने अख्ख मातीचे घर कोसळल्याची घटना भंडारा जिल्ह्यात घडली आहे. घर कोसळतानाचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. 


वेळीच पंचनामा करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी


भंडारा जिल्ह्यात पावसाची संततधार सुरुच आहे. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. सततच्या संततधार पावसामुळं मातीचे संपूर्ण घर कोसळल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील चिचाळ येथे घडली आहे. घर कोसळण्याची घटना लाईव्ह कॅमेरात कैद झाली आहे. यात घर मालकाचे लाखोंचे नुकसान झाले आहे. पवनी तालुक्यातील चिचाळ येथील रहिवासी मनीष खरवडे यांचे हे मातीचे घर होते. सततच्या पावसामुळं हे घर पडण्याच्या स्थितीत होते. दरम्यान, काल दुपारी घराची माती खचू लागल्यानं घरातील पाचही सदस्य घराबाहेर निघाले होते. काही क्षणातच घर कोसळले. खरवडे यांचे घर कोसळल्याने त्यांचे कुटुंब रस्त्यावर आलं आहे. दरम्यान, तालुका प्रशासनाने वेळीच पंचनामा करुन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी खरवडे कुटुंबियांनी केली आहे. 



 


गडचिरोली, भंडारा-गोंदिया आणि चंद्रपुरात पूरस्थिती कायम


गडचिरोली, भंडारा-गोंदिया आणि चंद्रपुरात पूरस्थिती कायम आहे. गोसीखुर्द धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे. त्यामुळं पुराच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. पूरस्थितीमुळे गडचिरोली, भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यात अनेक मार्ग बंद आहेत. तसंच पूराचा फटका बसलेल्या नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलं आहे. तसेच पुराचा धोका वाढण्याच्या शक्यतेनं नदीकाठच्या ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या चार दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुका संपर्काबाहेर होता. गावात पाणी शिरल्यानं अनेक घरं पाण्याखाली आली होती. आता पूर ओसरायला सुरुवात झाली असून, गावात पूर्ण चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. तरीही पर्लकोटा नदीवरील पूल पाण्याखाली असल्याने पूरपरिस्थिती कायम आहे. 


दोन दिवसाआधी भामरागड शहराला बेटाचे स्वरूप आले होते. चक्क शहरात बोटी चालत होत्या दोनशेहून अधिक लोकांना रेस्क्यू करुन सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. छत्तीसगढ राज्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळं भामरागड इंद्रावती नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. या पुराचा प्रवाह इतका मोठा होता की, शहरातील दोनशेहून अधिक घरे पाण्याखाली आली होती.


महत्त्वाच्या बातम्या: