Bhandara News : भंडाऱ्याचा साकोली येथील जुना शहरात असलेला मुख्य तलाव पहाटेच्या सुमारास फुटल्याची घटना घडली आहे. मुसळधार पावसामुळे तलाव तुडुंब भरला होता आणि तलाव फुटण्याची शक्यता साकुलीचे माजी नगरसेवक मनीष कापगते यांनी काही दिवसापूर्वीचं व्यक्त केली होती. मात्र, प्रशासनानं याकडं दुर्लक्ष केल्यानं आज पहाटे हा तलाव फुटला. तलावातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्यानं परिसरामधील शेतशिवारात सध्या जलमय स्थिती निर्माण झालेली आहे. तलाव फुटल्यानं साकोली ते चंद्रपूर हा महामार्ग बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर तलावाची पाळ फुटल्यानं साकोली - लाखांदूर महामार्गावरून ते पाणी प्रवाहित होत असल्यानं या परिसरात असलेले सुमारे 400 हेक्टर शेतजमीन जलमय झाली. त शेतीती पिकं पाण्याखाली आली असल्याने शेतीचं मोठं नुकसान झालं आहे.


साकोली - लाखांदूर महामार्ग वाहतुकीसाठी बंद


साकोली शहराच्या जुन्या वस्तीत असलेल्या 90 एकरातील माजी मालगुजारी तलाव ज्याची जलसंचय क्षमता 120 TCM एवढी आहे. हा तलाव पहाटेच्या सुमारास फुटला. मागील आठवड्यात अतिवृष्टी झाल्यानंतर तलाव तुडुंब भरला होता. तलावाची पाळ फुटल्यानं साकोली - लाखांदूर महामार्गावरून ते पाणी प्रवाहित होत असल्यानं या परिसरात असलेले सुमारे 400 हेक्टर शेतजमीन जलमय झाली असून पिकं पाण्याखाली आली आहे.


शेतात राहणाऱ्या वृद्ध दांपत्याच्या घरात पाणी शिरलं, मुलांच्या सतर्कतेनं जीव वाचला


शेतात राहून कुक्कुटपालनाचा व्यवसाय आणि शेती सांभाळणारे लांजेवार वृद्ध दांपत्य शेतातील घरात पहाटेच्या सुमारास गाढ झोपेत होते. याचवेळी साकोली शहरातील जुन्या वस्तीतील तलावाची पाठ फुटल्यानं पाण्याचा लोंढा शेतशिवारात पोहचला. साकोली ते लाखांदूर मार्गावरील शेतातील घरात राहणाऱ्या लांजेवार वृद्ध दांपत्यांच्या घरापर्यंत हा पाण्याचा लोंढा पोहचला. मात्र, पहाटे झोपेत असलेल्या या वृद्ध दांपत्याला याची कल्पना नव्हती. गावात राहणारे त्यांच्या मुलांना याची माहिती मिळतात त्यांनी वृद्ध आई-वडिलांचा जीव वाचवण्यासाठी थेट शेतात धाव घेतली आणि त्यांनी वृद्ध दाम्पत्यांना शेतातून बाहेर काढलं. यावेळी तिथे बांधलेली त्यांची दुधाळ पाळीव जनावरही पाण्याबाहेर काढलीत. मात्र, घरात साठवून ठेवलेलं वर्षभराचं अन्नधान्य आणि जीवनोपयोगी साहित्यसह कुक्कुटपालनाच्या 50 पेक्षा अधिक कोंबड्यांना बाहेर काढू शकले नाहीत.


तलाव फुटल्यानं पाण्याच्या लोंढ्यात अक्षरश: क्षणात घरात पाणी साचल्यानं आता घर हे पाण्याखाली आल्यानं घरातील संपूर्ण साहित्य पाण्याखाली आलं तर डोळ्यादेखत कोंबड्या वाहून गेल्याचा थरार साकोलीच्या लांजेवार दांपत्यांनी अनुभवला. या वृद्ध दांपत्यांना लाखो रुपयांच्या नुकसानीचा फटका बसला असून सध्या ते त्यांच्या मुलांकडं साकोली येथे सुरक्षितस्थळी आहेत.


आणखी वाचा