अतिशय छोटं आणि सुबक असलेल्या या मंदिराला आणि इथल्या भद्रनागाच्या मूर्तीला लोकांमध्ये मोठं श्रद्धेचं स्थान आहे. हे मंदिर किमान एक हजार वर्ष जुनं असल्याचे पुरातत्वीय दाखले आहेत. सध्या अस्तित्वात असलेलं मंदिर ११४६ साली बांधण्यात आलं आहे. ११४६ साली भद्रनाग मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आल्याचा शिलालेख या ठिकाणी आज ही आहे. त्यामुळे हे मंदिर त्याआधी सुध्दा अस्तित्वात होतं याची खात्री पटते. हे संपूर्ण भद्रनाग मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधण्यात आलं आहे. मंदिराचा आकार छोटा असला तरी हेमाडपंथी शैलीची सगळी वैशिष्ठ या मंदिरात आहेत. मंदिराला भक्कम असे ३६ खांब आहेत. आत ९ फण्यांची शेषनागाची सुमारे अडीच फूट उंचीची मूर्ती आहे. मंदिरात प्रवेश करताच अतिशय प्रसन्न वाटतं.
विशेष म्हणजे शेषनागाचं हे विदर्भातलं ऐकमेव मंदिर आहे. इथल्या या नागमूर्तीला भारतात तोड नसावी असं अभ्यासकांचं मत आहे.
या मंदिरावर श्रद्धा असणाऱ्या भाविकांची संख्या फार मोठी आहे. विदर्भासह, मध्यप्रदेश आणि तेलंगणातून मोठ्या प्रमाणात भाविक भद्रनागाच्या दर्शनाला नित्यनेमाने येतात. विशेषतः सोमवारी आणि बुधवारी येथे भाविकांची मोठी गर्दी असते. सकाळी ५.३०ला मंदिर उघडल्यावर नित्यनेमाने अभिषेक, पूजा आणि महाआरती होते. नागपंचमी आणि महाशिवरात्रीला भाविक सर्वाधिक गर्दी करतात.
भद्रनागाला घरात कुठलंही शुभकार्य निघालं, काही संकट आलं की लोकं भद्रनागाला आवर्जून हजेरी लावतात. इथं नवस बोलण्याची मोठी परंपरा आहे आणि त्यानुसार नवस पूर्ण झाला की लोकं मंदिरात येऊन कढई (शिऱ्याचा प्रसाद) आणि स्वयंपाक करतात. मंदिराच्या आवारात अतिशय जुनी विहीर असून त्यात उतरायला पायऱ्या आहेत. या विहिरीत भगवान शेषनाग हे गुप्त रूपाने राहतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे लोकं या विहिरीचं देखील आवर्जून दर्शन घेतात.
देवावर श्रद्धा ठेवणारे तर इथे नित्यनेमाने भेट देतातच, पण शेकडो वर्ष जुन्या भारतीय संस्कृतीच्या अनेक खाणाखुणा इथे असल्यानं अनेक अभ्यासकांनाही येथे हजेरी लावतात. इथल्या भद्रनागापुढे तुम्ही नतमस्तक व्हा अथवा होऊ नका पण या ठिकाणी असलेलं पुरातत्विय वैभव तुम्हाला नक्कीच भुरळ पाडेल. मंदिराच्या परिसरात असलेली क्षीरसागरात आराम करत असलेली शेषशाही विष्णूची मूर्ती, यक्ष, गंधर्व, योगिनी, त्रिमूर्तीच्या रूपात असलेले ब्रम्हा-विष्णू-महेश, गणपती मूर्तिकला म्हणून पाहायला काय हरकत आहे.
VIDEO: