मुंबई : काळा पैसा पांढरा करणाऱ्या टोळीची मदत केल्याचा आरोप मुंबई पोलिस विभागातील एका सहाय्यक पोलिस निरीक्षकावर करण्यात आला आहे. सांताक्रुज पोलिस ठाण्यातील एपीआय संजय माळींवर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे.


संजय नाईक नावाच्या कंत्राटदाराला तीन कोटींचा काळा पैसा पांढरा करण्यासाठी एका टोळीला एपीआय संजय माळींनी मदत केल्याचा आरोप आहे. नाईक मंगळवारी दुपारी सांताक्रुज रेल्वे स्टेशनवर मित्रांसोबत तीन कोटींचा काळा पैसा पांढरा करण्यासाठी आले होते.

आयसीआयसीआय बँकेचे कर्मचारी असल्याची बतावणी करणाऱ्या सहा जणांनी नाईक यांना पैसा पांढरा करण्याची हमी दिली, अशी माहिती पोलिस सुत्रांनी दिली आहे. बोलणी सुरु असतानाच माळी तिथे आले आणि चौकशी करण्याचं नाटक केलं. या गोंधळाचा फायदा घेत सात जणांनी तीन कोटींच्या रकमेसह पोबारा केला.

एपीआय संजय माळी या टोळीशी संबंधित असून चोरीच्या कटात सहभागी असल्याची तक्रार कंत्राटदार संजय नाईक यांनी सांताक्रुज पोलिसात दिली आहे. त्यानंतर संजय माळींवर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे.