बीड: गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात होणाऱ्या गुन्हेगारीच्या घटनेने राज्यभरात चर्चा सुरू झाली आहे. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरण (Santosh Deshmukh Case) त्यानंतर आता मरळवाडीचे सरपंच असलेल्या बापू आंधळे (Bapu Andhale) यांना गोळी घालून त्याची हत्या करण्यात आली, त्यामध्ये देखील वाल्मिक कराडचा (Walmik Karad) हात असल्याच्या चर्चा आहेत, काही नेत्यांनी त्याबाबत आरोप केल्याचंही चित्र दिसून येत आहे. परळीत शहरात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याची हत्या करण्यात आली. मरळवाडीचे सरपंच असलेल्या बापू आंधळे (Bapu Andhale) यांना गोळ्या घालून जीवे मारण्यात आलं. या प्रकरणात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी बबन गित्ते(Baban Gitte) याच्यासह पाच जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर आता या प्रकरणात अनेक आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. त्याचबरोबर गित्तेच्या घरी गोळीबार झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
कराडच्या सांगण्यावरून हल्ला केल्याचा आरोप केलेला महादेव गित्ते कोण?
महादेव उद्धव गित्ते (वय 34 वर्षे), रा. नंदागौळ, ह.मु. बँक कॉलनी, परळी, सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे पदाधिकारी आणि सरपंच बापू आंधळे यांच्या हत्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत बीड जिल्हा कारागृहामध्ये आहे. 29 जून 2024 दुपारी 4 ते सायंकाळी 6.30 वाजण्याच्या दरम्यान महादेव गित्ते याच्या घरावर गोळीबार झाल्याचा दावा करण्यात आला आहे. वाल्मिक कराड याच्या सांगण्यावरून गोळीबार केल्याचा महादेव गित्तेचा आरोप आहे.
बापू आंधळे यांनी छातीत बुक्की मारली आणि फायरींग केले, ज्यात महादेव यांच्या पोटात गोळी लागली होती. या हल्ल्यात बापू आंधळे यांनाही गोळी लागली आणि बापू आंधळेचा मृत्यू झाला. याप्रकरणी महादेव गीते यानी दिलेल्या फिर्यादीत बापू आंधळे, राजेश ऊर्फ धनराज श्रीरंग फड, रघुनाथ फड ,ग्यानोबा ऊर्फ गोट्या मारोती गित्ते, सनी देवडे, सोमनाथ सलगरे, वाल्मिक कराड यांच्यासह इतर 20 अनोळखी व्यक्तींचा समावेश आहे.
परळी शहर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम 307, 323, 326, 427, 143, 147, 148, 149, 504, 506, अंतर्गत गुन्हा दखाल करण्यात आला आहे. महादेव गीते हा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते बबन गीते याचा कार्यकर्ता आहे. खून झालेला बापू आंधळे हा राष्ट्रवादी अजित पवार गटाचा धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता होता.
नेमकं प्रकरण काय?
29 जून रोजी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास आरोपींनी कट रचून मयत बापू आंधळे आणि ग्यानबा गित्ते यांना आरोपी महादेव गित्ते यांच्या परळीतील बँक कॉलनीतील घरी बोलावले. तिथे बबन गित्ते आणि मयत सरपंच बापू आंधळे यांना शिवीगाळ करत म्हणाले की, 'तू पैसे आणलेस का?' त्यावर बापू आंधळे म्हणाले की, 'आईवरून शिव्या देऊ नका.' बापू आंधळेंनी शिवीगाळ करू नका असे म्हणताच बबन गित्तेंनी कमरेला असलेले पिस्तूल काढलं आणि बापू आंधळे यांच्या डोक्यात गोळी झाडली. तितक्यात राजाभाऊ नेहरकरने आंधळेंच्या डोक्यात कोयत्याने वार केला. त्यातच आंधळे यांचा जागेवरच मृत्यू झाला. या घटनेनंतर महादेव गित्तेने आंधळेंसोबत आलेल्या ग्यानबा गित्ते यांच्यावर गोळी झाडली. ग्यानबा गित्ते यांच्या छातीच्या उजव्या बाजूला गोळी लागली. त्यानंतर मुकुंद गित्ते आणि राजेश वाघमोडे यांनी ग्यानबा गित्ते यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. यात ते गंभीर जखमी झाले. या प्रकरणी पोलिसांनी बबन गित्ते यांच्यासह पाच जणांविरुद्ध हत्या आणि हत्येचा प्रयत्न केल्याच्या इतर भारतीय दंड विधान कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.
गुन्हा दाखल झाला ते पाच आरोपी कोण?
1) शशिकांत पांडुरंग गित्ते ऊर्फ बबन गित्ते, रा. बँक कॉलनी परळी.
2) मुकुंद ज्ञानेश्वर गित्ते, रा. वाघबेट ता. परळी
3) महादेव उद्धव गित्ते, रा. बँक कॉलनी परळी
4) राजाभाऊ संजीवन नेहरकर, रा. पांगरी, ता. परळी
5) राजेश अशोक वाघमोडे, रा. पिंपळगाव गाडे, ता. परळी