मुंबई: शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या गाडीच्या अपघातासाठी जो ट्रक कारणीभूत ठरला आहे त्याची ओळख पटली असून तो ट्रक पालघरमधील असल्याचं समजतंय. या ट्रक मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून सध्या हा ट्रक गुजरातमध्ये असल्याने पोलिसांची एक तुकडी गुजरातला रवाना झाली आहे. 


पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर आज शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या कारचा भीषण अपघात होऊन त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.  ज्या ट्रक बरोबर हा अपघात घडला तो ट्रक पालघर जिल्ह्यातील कासा येथील असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. या ट्रकचा नंबर DN 09 P 9404 असा असून हा ट्रक आयसर कंपनीचा असल्याची माहिती आहे. या ट्रक चालकाचे नाव उमेश यादव असं असल्याचं सांगितलं जातं. हा ट्रक ताब्यात घेण्यासाठी पालघर पोलीस गुजरातमधील वापी येथे रवाना झाले असून ट्रकची ओळख पटविण्यासाठी ट्रक मालकाला सोबत घेतले असल्याची माहिती दिली आहे. 


दरम्यान, ट्रकची ओळख पटणं ही या तपासातील महत्त्वाची गोष्ट असून त्यामुळे हा अपघात होता की घातपात याच्या तपासाला गती मिळणार आहे. 


असा झाला अपघात, एबीपी माझाला मिळालेली माहिती 


विनायक मेटे आज पहाटे बीडवरुन मुंबईला येत असताना मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर (Mumbai Pune Express Highway) ही घटना घडली. विनायक मेटे हे मागच्या सीटवर डाव्या बाजूला बसले होते. पुढच्या सीटवर ड्रायव्हरच्या बाजूला त्यांचा बॉडीगार्ड होता. मेटे यांची गाडी हायवेच्या मधल्या लेनमध्ये होती. 10 चाकी ट्रक हा तिसऱ्या लेनला चालत होता. या ट्रकचालकाने तिसऱ्या लेनमधून मधल्या लेनमध्ये येणाचा प्रयत्न केला. यावेळी मेटे यांची गाडी वेगात होती. अचानक ट्रक मधे आल्यानं वेगानं मेटे यांची गाडी ट्रकला धडकली. चालकाला गाडी कंट्रोल करणं जमलं नाही. मेटे यांची गाडी डाव्या बाजूने ट्रकच्या उजव्या बाजूला धडकली. मेटे यावेळी झोपेत होते, त्यामुळं त्यांना काही कळायच्या आत वेगाने धडक बसल्यानं डोक्याला मार बसला. यात मेटे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर बराच वेळ मेटे यांना मदत मिळाली नाही. या अपघातानंतर ट्रकचालक हा फरार झाला आहे. पोलिस सीसीटीव्हीच्या माध्यमातून याची पाहणी करत आहेत. चौकशीसाठी 8 पथकं नियुक्त करण्यात आली असल्याची माहिती आहे. 


विनायक मेटे यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार
शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूनंतर बीड शहरावर शोककाळा पसरली आहे. मेटे यांचं पार्थिव मुंबईवरून बीड शहरामध्ये रात्री आणले जाईल आणि त्यानंतर बीड शहरातील शिवसंग्राम कार्यालयासमोर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. उद्या अंतदर्शन झाल्यानंतर विनायक मेटे यांची अंत्ययात्रा अण्णाभाऊ साठे चौक मार्गे जालना रोडकडून डीपी रोडवर असणाऱ्या विनायक मेटे यांच्या शेतात आणलं जाईल. तिथं त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या ठिकाणी प्रशासनाकडून अंत्यसंस्कारासाठी जोरदार तयारी सध्या सुरू आहे.