Vinayak Mete: विनायक मेटेंच्या पार्थिवावर उद्या संध्याकाळी 4 वाजता बीडमध्ये अंत्यसंस्कार होणार आहे. मेटे यांना आपल्या आयुष्यात टप्या-टप्प्यांवर संघर्ष करावा लागला आहे. शेतात बालमजुरी करून त्यांनी दहावीपर्यंत शिक्षण घेतेले. त्यांनतर पुढे त्यांनी केएसके महाविद्यालयात प्रवेश घेतला. महाविद्यालयात असताना ते विद्यार्थी चळवळीत सामील झाले. याच चळवळीने त्यांचे पाय मुंबईकडे वळवले. पण मुंबईत सुद्धा देखील त्यांना मोठा संघर्ष करावा लागला. 


भेंडीबाजारात वेटरचं काम...


महाविद्यालयात चळवळीत सामील झालेले मेटे मुंबईत आले. मुंबईतील चेंबूरमध्ये मामांकडे राहायला लागले. या काळात त्यांना आरसीएफ कंपनीत शिपायाची नोकरी मिळाली. पण संप झाला आणि नोकरी गेली. हातावर पोटं होतं त्यामुळे भेंडीबाजारातल्या एका हॉटेलमध्ये त्यांनी वेटरची नोकरी करायला सुरवात केली. हॉटेलमध्ये काम करतांना त्यांना पाच रुपये रोजचा पगार आणि वरुन मिळेल ती टिप खिशात पडायची. मात्र अवहेलनेमुळे मेटेंनी ती नोकरी सोडली आणि एका चपलेच्या दुकानातही काम केलं. इथेही ते फार काळ रमले नाहीत. 


गल्लोगल्ली भाजीपाला विकला 


चपलेच्या दुकानातील काम सोडल्यावर मेटे यांना भिवंडीतल्या एका कापड मिलमध्ये शिपाईची नोकरी लागली. पण अस्थिरता पाचवीला पुजलेली, पुन्हा संप झाला आणि पुन्हा नोकरी गेली. मुंबईतल्या मिल बंद पडत गेल्या आणि मेटेंवर बेकारीची कुऱ्हाड पुन्हा कोसळली. दरम्यानच्या काळात कुणी तरी सांगितलं की, भाजी विकून चांगले पैसे मिळतात. त्यामुळे मेटेंनी भाजीची एक टोपली विकत घेतली. आणि गल्लोगल्ली भाजी विकू लागले. सहा महिने कसा बसा व्यवसाय चालला. पण तोही त्यांनी सोडून दिला. 


प्रसंगी वाळूच्या खेपा टाकल्या 


मेटेंचे बंधू मुंबईत पेंटरचं काम करायचे. त्यामुळे विनायकरावांनी त्यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला. मुंबईतल्या अनेक इमारतींवर मेटेंच्या हाताने ब्रश फिरला. पुढे चेंबूरच्या एका झोपडीत वास्तव्य आणि मुलुंडमध्ये एका इमारतीवर सुपरवायझर म्हणून काम मिळाले. प्रसंगी मेटे यांनी सिमेट आणि वाळूच्या खेपा टाकण्याचं काम केलं. हळूहळू मालकांचा विश्वास वाढला आणि ते सुपरवायझर बनले. याच काळात अनेक मोठ्या बिल्डरांची ओळख झाली. रंगकामाची कंत्राटे मिळू लागली. पुढे जेजे. रुग्णालय, आमदार निवास रंगकामाची कंत्राटे मेटे यांना मिळाली आहे. एकीकडे अस्तित्वाचा लढा होता, पण दुसरीकडे मेटेंचं समाजाशी आणि मराठा महासंघाशी नातं कायम होते. त्यामुळे त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत समाजाच्या हितासाठी त्यांनी कधीच माघार घेतली नाही.