Beed Hingani and Munde Village with No Road : पावसाळा आला की रस्त्यावर खड्डे पडतात आणि रस्ते खराब झालेत म्हणून आपण सगळे प्रशासनाच्या नावानं आरडाओरड करतो. पण ज्या ठिकाणी रस्ताच कायम पाण्यात असतो आणि पाण्यातून वाट काढत ज्यांना कायम जीव मुठीत घेऊन संघर्ष करावा लागतो त्यांचं काय? ही संघर्षाची कहाणी आहे बीडच्या हिंगणी आणि मुंडे वस्तीवरच्या नागरिक आणि चिमुकल्यांची..


जगण्यासाठी नागरिकांचा संघर्ष


बीडमधील हिंगणी, आंधळे आणि मुंडे वस्तीतील नागरिकांना रस्त्याअभावी नदीच्या पाण्यातून वाट काढावी लागतेय. यांच्याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होतंय. रस्त्याअभावी या गावातील नागरिकांचा जगण्यासाठी संघर्ष सुरु आहे. हिंगणी गावातील जनार्धन मुंडे वयाच्या 70 व्या वर्षी कमरेइतक्या पाण्यातून दूध घेऊन जातात. दररोज 30 लिटर दूध ते डेरीला घेऊन जातात मात्र हे दूध घेऊन जाण्यासाठी त्यांना दररोज नदीच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागतोय.


वर्षभर जीव धोक्यात घालून करावा लागतो प्रवास


पाण्यातून वाट काढत रस्ता पार करणाऱ्या नागरिकांच्या समस्या काही नवीन नाहीयेत. तुम्ही पाहिलं असेल की, राज्यात अनेक ठिकाणी केवळ पावसाळ्यात नदीला पाणी आलं म्हणून अनेक गावांचा रस्ता बंद होतो. इथे मात्र हिंगणी गावच्या आंधळे आणि मुंडे वस्तीच दुर्दैवं अस आहे की, त्यांना वर्षभर कायम आपला जीव धोक्यात घालून या पाण्यातूनच वाट काढावी लागते.


या वस्तीवर राहणाऱ्या चिमुकल्यांना अक्षराची ओळख होण्यापूर्वीच आपले पाय या मांजरा नदीमध्ये बुडवावे लागतात..तरच त्यांच्या शिक्षणाचा प्रवास सुरू होतो कारण या वस्तीवरून हे चिमुकले याच पाण्यातून रोज शाळेत येतात आणि शाळेतून घरी जातात.. पावसाळ्याच्या दिवसात जर या नदीला मोठा पूर आला तर या विद्यार्थ्यांची शाळा महिनाभर बंद ठेवावी लागते.


नदीवर पूल बांधण्याचं फक्त आश्वासन


मांजरा नदीच्या काठावर असलेलं हिंगणी गाव आणि नदीच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या दोन वस्त्या. याच वस्त्यांवरील लोकांना जर गावात यायचं असेल तर मांजरा नदी रोज ओलांडावी लागते. अनेक वेळा राजकीय नेते आणि प्रशासनाकडे नदीवर पूल बांधून देण्याची मागणी या गावकऱ्यांनी केली, मात्र आश्वासनाशिवाय त्यांना काहीच मिळालं नाही. 


हिंगणी आणि मुंडे वस्तीतील नागरिकांचा संघर्ष केव्हा मिटणार?


येणारा काळ हा निवडणुकांचा आहे मग जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीपासून ग्रामपंचायत निवडणुकीपर्यंत मतदानासाठी राजकीय नेते याच पाण्यातून या आंधळे वस्ती आणि मुंडे वस्तीवर येणार आहेत. तेव्हा राजकीय नेत्यांना इथेच नक्की जाब विचारण्याची तयारी गावकरी आहेत. हिंगणी, आंधळे आणि मुंडे वस्तीतील नागरिकांचा संघर्ष केव्हा मिटणार हे पाहावं लागेल.