बीड : जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh deshmukh) यांच्या हत्याप्रकरणानंतर येथील राजकीय व सामाजिक वातावरण तापलं असून मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. सरपंच खून प्रकरणातील आरोपी, व खंडणी प्रकरणातील आरोपी हे मंत्री धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय असल्याचा आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. विशेष म्हणजे राजीनाम्यासाठीचा वाढता दबाव पाहून धनंजय मुंडेंनी थेट भगवान गड गाठून महंत नामदेव शास्त्रींसोबत (Namdeo shastri) चर्चा केली. त्यानंतर, भगवाड गड भक्कमपणे धनंजय मुंडेंच्या पाठीशी असल्याचं नामदेव शास्त्रींनी म्हटलं होतं. तसेच, आरोपींच्या मानसिकतेवर महंतांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली. आता, महंत नामदेव शास्त्रींच्या भूमिकेवर भाष्य करणाऱ्या बीडमधील भागचंद महाराज झांजे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात येत आहेत. यासंदर्भात झांजे महाराजांनी बीड पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दिली आहे. 

Continues below advertisement


माझ्या जीविताचं काही बरं वाईट झालं तर याला भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज आणि त्यांचे अनुयायी जबाबदार असतील, असे भागचंद महाराज झांजे यांनी पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. महंत नामदेव शास्त्री महाराजांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींच्या मानसिकते संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर राज्यभरातून त्यांच्यावर प्रखर शब्दात प्रतिक्रिया उमटल्या. तर, सोशल मीडियातूनही महंतांना ट्रोल करण्यात आलं. दरम्यान, त्यावर भागचंद महाराज यांनी देखील माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे, नामदेव शास्त्री महाराज यांच्या अनुयायांनी गेल्या पाच दिवसापासून फोनवरुन झांजे महाराजांना धमक्या देण्यास सुरू केलं आहे. महाराष्ट्रात फिरू देणार नाही, तंगडे तोडू जीवे मारू, ठोकून काढू, असे फोन कॉल झांजे यांना सुरू झाले आहेत. त्यामुळे, माझ्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर याला महंत नामदेव शास्त्री महाराज आणि त्यांचे अनुयायीच जबाबदार असतील, अशा आशयाची लेखी तक्रार भागचंद महाराजांनी बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात दिली आहे. 


महंत यांच्या वक्तव्यावर मी संवैधानिक मार्गाने प्रतिक्रिया दिली. चूक झाली असेल तर गुन्हा दाखल करा, मात्र मला जीवे मारण्याची धमकी का देता? असा सवाल हभप भागचंद महाराज झांजे यांनी उपस्थित केला आहे. तसेच, शास्त्री महाराजांनी माझ्यावर वार करण्याची धमकी देणाऱ्या अनुयायांना आवरावे, असे आवाहनही भागचंद महाराजांनी केलं आहे. 


धनंजय देशमुखांनी घेतली महंतांची भेट


दरम्यान, भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर भाष्य करताना, आरोपींच्या मानसिकतेचाही विचार व्हायला हवा, कारण अगोदर त्यांना मारहाण झाली होती, असे वक्तव्य केलं होतं. त्यानंतर, त्यांच्यावर चोहोबाजुनी टीकेची झोड उठली. तर, मृत संतोष देशमुख यांच्या भावाने व लेकीने गडावर जाऊन त्यांनी आपली बाजू समजावून सांगितली होती. त्यानंतर, महाराजांनी आपण संतोष देशमुख कुटुंबीयांच्या पाठीशी असल्याचं म्हटलं होतं.  


हेही वाचा


अखेर अभिनेता राहुल सोलापूरकरचा राजीनामा; लोकं रस्त्यावर, नेत्यांनी इशारा दिल्यानंतर उपरती