मुंबई : धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या वागण्यामुळेच पंकजा मुंडे यांचा लोकसभेत पराभव झाला, मात्र त्यासाठी आम्हाला जबाबदार ठरवण्यात आलं असा आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला. वाल्मिक कराडमुळेच बजरंग सोनवणे हे धनंजय मुंडे यांना सोडून गेले. समोर तगडा उमेदवार उभा राहिल्यानेच पंकजा पराभूत झाल्या असंही सुरेश धस म्हणाले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना सुरेश धस यांनी हे वक्तव्य केलं. 


वाल्मिक कराडमुळे बजरंग सोनवणे मुंडेंपासून दूर


वाल्मिक कराडने धनंजय मुंडेंना एकही मित्र ठेवला नाही असा आरोप आमदार सुरेश धस यांनी केला. ते म्हणाले की, "वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेमुळे बजरंग सोनावणे हे धनंजय मुंडेंपासून बाजूला गेले. एकवेळ बजरंग सोनावणे हे धनंजय मुंडे यांच्या अत्यंत जवळचे मित्र होते. पण वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेमुळे ते मुंडेंपासून दूर गेले. विष्णू चाटेला तालुका अध्यक्ष करायची गरज काय होती? बजरंग सोनवणेसारखा तगडा उमेदवार समोर असल्यानेच पंकजा यांचा पराभव झाला. ते बाजूला गेले नसते तर पंकजा मुंडे कधीच पडल्या नसत्या."


वाल्मिक कराडच्या दहशतीमुळे पंकजा मुंडेंचा पराभव


पंकजा मुंडे यांचा पराभव हा धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडच्या दहशतीमुळे, त्यांच्या वागण्यामुळे झाला असा आरोप यावेळी सुरेश धस यांनी केला. धनंजय मुंडे यांची परळीत दहशत नाही, पण वाल्मिक कराडची आहे. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडमुळे अनेकजण पंकजा मुंडेंवर नाराज झाले. त्याचा परिणाम हा लोकसभेच्या निवडणुकीत झाला. पंकजा मुंडे यांना माझ्या मतदारसंघातून 31 हजारांचे लीड मिळाले. परळीमधून 73 हजारांचे लीड मिळाले. पण एकट्या बीड तालुक्यातून त्या 98 हजारांनी मागे पडल्या असं सुरेश धस म्हणाले. 


पंकजा मुंडेंना हे सर्व माहिती आहे. पण त्या थेट बोलू शकत नाही. म्हणून मी हे बोलतोय असंही सुरेश धस म्हणाले. आम्ही प्रामाणिक काम केलं. पण लोकसभेचा पराभव आमच्यामुळे झाला असं सांगत जबाबदार ठरवण्यात आलं. त्यामुळेच विधानसभेला आमच्याविरोधात पंकजा मुंडे यांनी उमेदवार दिला असल्याचं सुरेश धस म्हणाले. 


मला संरक्षणाची गरज नाही


बीड प्रकरण हे गंभीर असून त्याविरोधात आवाज उठवणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे त्यांना संरक्षण देण्यात यावं अशी मागणी शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. त्यावर प्रतिक्रिया देताना सुरेश धस म्हणाले की, मी कुणालाही घाबरत नाही. मला कुठल्याही संरक्षणाची गरज नाही. पण जे लोकप्रतिनिधी या विरोधात आवाज उठवतात त्यांच्या कुटुंबीयांना संरक्षण दिली जावी.


ही बातमी वाचा: