मुंबई : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी निकटवर्तीयांना अटक झाल्यानंतर अडचणीत आलेल्या धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांसह महायुतीतील नेत्यांनीही केली आहे. अजित पवारांनी त्यांना मंत्रिपदावरून काढावं, अन्यथा तपासकार्यामध्ये हस्तक्षेप होण्याची शक्यता अनेकांनी वर्तवली. या पार्श्वभूमीवर अजित पवार आणि धनंजय मुंडे यांची भेट होऊन सव्वा तास चर्चा झाली. पण ही भेट नवीन वर्षांच्या शुभेच्छा देण्यासाठी आहे असं धनंजय मुंडे यांनी माध्यमांना सांगितलं. आपल्याला मिळालेल्या खात्याचा अहवाल आपण अजितदादांसमोर ठेवला असल्याची माहितीही त्यांनी दिली. 


संतोष देशमुखांच्या हत्येमध्ये धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराड, विष्णू चाटे यांच्यासह पाच जणांना अटक झाली आहे. या प्रकरणात सबळ पुरावे असल्याची माहिती आहे. पवनचक्की कंपनीकडे वाल्मिक कराड याने दोन कोटींची खंडणी मागितली आणि त्याच वादातून संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचा आरोप केला जातोय. 


या प्रकरणात भाजपचे आमदार सुरेश धस, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर, अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके, खासदार बजरंग सोनावणे यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यासाठी बीड, परभणी आणि पुण्यामध्ये मोर्चेही काढण्यात आले. 


धनंजय मुंडे राजीनामा देणार का? 


संतोष देशमुख हत्या प्रकरणी तपासकार्यात दबाब येऊ नये यासाठी धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरून हटवण्याची मागणी करण्यात येत आहे. राज्यभरातील नेत्यांकडून तशी मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे सव्वा तास बंद दाराआड चर्चा झाली. या चर्चेचा तपशील बाहेर आला नसता तरी संतोष देशमुख हत्याप्रकरणावरच चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. 


शुभेच्छा देण्यासाठी दादांची भेट


मस्साजोगचे प्रकरण झाल्यानंतर वाढता दबाव लक्षात घेता धनंजय मुंडे यांनी अजित पवारांची भेट घेतली. सुमारे दोन तास चर्चा झाल्यानंतर मुंडे बाहेर आहे. त्यावेळी तुम्ही राजीनामा देणार का, दादांशी कोणत्या विषयावर चर्चा झाली असे प्रश्न त्यांना विचारण्यात आले. त्यावेळी आपण फक्त नवीन वर्षांच्या शुभेच्छा देण्यासाठी दादांची भेट घेतल्याचं मुंडे यांनी सांगितलं.


आपल्याला मिळालेल्या अन्न आणि पुरवठा खात्याचा अहवाल आपण यावेळी अजितदादांसमोर ठेवल्याचं धनंजय मुंडे यांनी सांगितलं. तसेच या चर्चेमध्ये कोणताही राजकीय विषय नव्हता असंही त्यांनी स्पष्ट केलं.