बीड: शरद पवार (Sharad Pawar) यांचे निवासस्थान असलेल्या गोविंद बागेत (Govind Bagh) आज दिवाळी पाडवा साजरा होत आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर गोविंद बागेत पहिलाच दिवाळी पाडव्याचा कार्यक्रम होत आहे. शरद पवार, सुप्रिया सुळे (Supriya Sule) हे कार्यकर्त्यांची भेट घेत शुभेच्छांचा स्वीकार करत आहेत. मात्र, याचवेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांची (Ajit Pawar) या कार्यक्रमातील गैरहजेरी सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. दरम्यान, गोविंद बागेतील अजित पवारांच्या गैरहजेरी बाबत आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. 


बारामतीमधील निवासस्थान असलेल्या गोविंद बागेत पाडव्याच्या निमित्ताने शरद पवार कार्यकर्त्यांची भेट घेत शुभेच्छांचा स्वीकार करत आहेत. तर, याचवेळी अजित पवार उपस्थित नसल्याच्या प्रश्नाला उत्तर देतांना रोहित पवार म्हणाले की, "डॉक्टरांनी आराम करण्याचे सांगितल्यानंतर सुद्धा शरद पवार आज लोकांना भेटण्यासाठी सकाळपासून उभे आहेत. तर, अजित पवार हे देखील आजारी आहेत, त्यामुळे ते गोविंद बागेच्या कार्यक्रमात आले नसतील असं रोहित पवार म्हणाले. 


राष्ट्रवादीमधील फुटीनंतर गोविंद बागेतील पहिलाच दिवाळी पाडवा..


राज्यभरातून पदाधिकारी आणि कार्यकर्ते दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी गोविंद बागेत आले आहेत. सकाळपासूनच गोविंद बागेबाहेर कार्यकर्ते जमायला सुरुवात झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. यावेळी शरद पवार, सुप्रिया सुळे कार्यकर्त्यांची भेट घेत शुभेच्छांचा स्वीकार करत आहेत. महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादीमधील फुटीनंतर यंदाच्या गोविंद बागेतील दिवाळी पाडव्याला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार का? याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान गोविंद बागेबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. 


रोहित पवार बीडमध्ये दिवाळी पाडवा साजरा करणार 


बीडमधील शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय जमावाने पेटवून दिल्यानंतर, आता त्याच कार्यालयामध्ये रोहित पवार हे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसोबत दिवाळी पाडवा साजरा करत आहेत. पाडव्याच्या निमित्ताने बारामतीमध्ये दरवर्षी पाडव्याला संपूर्ण पवार कुटुंब एकत्र येतात. मात्र, या पाडव्याला रोहित पवार हे कुटुंबासमवेत बीडमध्ये आहेत. तर, अजित पवार देखील अद्याप गोविंद बागेत पोहचलेले नाहीत. त्यामुळे यंदा पहिल्यांदाच पवार कुटुंबातील सदस्य वेगवेगळ्या ठिकाणी दिवाळी पाडवा साजरा करतांना पाहायला मिळत आहे. 


पुन्हा निघणार संघर्ष यात्रा.. 


मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनामुळे रोहित पवारांनी काढलेल्या संघर्ष यात्रेला स्थगिती देण्यात आली होती. मात्र, आता पुन्हा एकदा पुढील टप्प्यात ही संघर्ष यात्रा काढली जाणार असल्याचे रोहित पवारांनी म्हटले आहे. "काही लोकांना वाटले होते की, राज्यातील सवेंदशिल परस्थिती असताना ही यात्रा पुन्हा चालू होणार नाही. पण आम्ही दिलेला शब्द पाळला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात संघर्ष यात्रा निघणार आहे.  सरकारबद्दलचा रोष मला या संघर्ष यात्रामध्ये पाहायला मिळाला. तर, दुष्काळ सारख्या गंभीर विषयावर सरकार राजकारण करत आहे. आग्रिम पिक विमा शेतकऱ्यांना किती रुपयांचा मिळाला तपासा," असेही रोहित पवार म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


श्रीनिवास पवारांच्या घरी जमला कुटुंब मेळा, शरद पवारांसह अनेकांची उपस्थिती, सुनेत्रा वहिनी हजर पण दादांच्या येण्याकडे सर्वांच्या नजरा