Beed Sirsala Bandh: बीड : बीड लोकसभा मतदारसंघातून (Beed Constituency) पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना पराभवाचा सामना करावा लागला. तेव्हापासूनच बीड (Beed News) शहरासह आसपासच्या गावांत तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) बीड मतदारसंघात भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आणि त्यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट व्हायरल झाल्या. या पोस्टमध्ये भावनिक पोस्टसोबतच आक्षेपार्ह पोस्टही व्हायरल झाली होती. या आक्षेपार्ह पोस्टवरुन मोठा तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. आक्षेपार्ह पोस्टच्या निषेधार्थ आधी पाथर्डी बंद, त्यानंतर शिरुर, परळी, वडवणी बंदची हाक देण्यात आली होती. अशातच आता सीरसाळा शहर बंदची हाक देण्यात आली आहे.
पंकजा मुंडे यांच्या संदर्भातील सोशल मीडियावर होणाऱ्या वादग्रस्त पोस्टर विरोधात आज सीरसाळा शहर बंदची हाक देण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे यांच्या संदर्भामध्ये बीड जिल्ह्यात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वादग्रस्त लिखाण करण्यात आलं. या आक्षेपार्ह्य पोस्टच्या विरोधामध्ये यापूर्वी शिरूर त्यानंतर परळी शहर त्यानंतर वडवणी शहर बंदची हाक देण्यात आली होती. आता या शहरांपाठोपाठ आज सीरसाळा शहर बंदची हाक देण्यात आली आहे. ओबीसी बांधवांच्या वतीनं शहर बंदची हाक देण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, सीरसाळा शहरातील या बंदमध्ये ओबीसी समाजातील सगळ्या जाती धर्मातील लोक सहभागी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सीरसाळा शहरातील बंद पाडण्यासाठी शहरातून मोठी रॅली काढण्यात आली होती. काही दिवसांपासून पंकजा मुंडे यांच्यासंदर्भातील आक्षेपार्ह्य पोस्टवरुन गदारोळ सुरू आहे.
बीड लोकसभा मतदारसंघातील निकालानंतर नेमकं काय घडलं?
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांत बीडचा निकाल अत्यंत धक्कादायक होता. बीडमध्ये अत्यंत चुरशीच्या लढतीत भाजप नेत्या पंकजा मुंडेंना पराभवाचा सामना करावा लागला. मराठा आंदोलनामुळे हिंसेची धग बसलेल्या बीड लोकसभा मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून बजरंग सोनवणे यांनी दणदणीत विजय मिळवला. पण, परळीमध्ये पंकजा मुंडे यांना 74 हजार 834 मतांची आघाडी मिळाल्याचं पाहायला मिळालं.
बीडमधील परळी हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघात धनजंय मुंडे आणि पंकजा मुंडे बहीण भाऊ एकत्र आल्यानंतर ताकद वाढली होती. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत पंकजा मुंडेंचा विजय पक्का असल्याचं बोललं जात होतं. बीड आणि गेवराई या दोन मतदारसंघात बजरंग सोनवणे यांनी आघाडी घेतली. या दोन मतदारसंघात पंकजा मुंडेंना मोठा फटका बसला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत निकाल जाहीर झाल्यानंतर मात्र पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्याचा निकाल जाहीर झाला. निकाल स्पष्ट झाल्यानंतर पंकजा मुंडे यांच्या संदर्भात एका तरुणानं आक्षेपार्ह पोस्ट केली. आरोपीनं फेसबुकवर काही कार्यकर्ते नाचत असलेला एक व्हिडीओ पोस्ट केला. तसेच व्हिडीओखाली आक्षेपार्ह पोस्ट लिहिली.