Holi 2023 : आज संपूर्ण देशभर धुलीवंदनचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र आजच्या दिवशी बीडमध्ये जावयाला चक्क गाढवावर बसवून त्याची गावभर मिरवणूक काढली जाते. बीड जिल्ह्यातील विडा गावात ही परंपरा जपली जाते. 


मागच्या 90 वर्षा पेक्षा जास्त काळापासून बीडच्या केज तालुक्यातील विडा या गावात हटके पद्धतीने धुलीवंदन साजरा करण्यात येतो. गावच्या जावयाला चक्क गाढवावर बसवून मिरवणूक काढण्यात आली. एरवी आपला मिजाज दाखविणारा जावई मात्र धुलीवंदनाच्या दिवशी हत्ती-घोड्यावर नाही तर चक्क गाढवावर बसलेला दिसून आला. ही अनोखी परंपरा जहागीरदार आनंदराव देशमुख यांनी सुरु केली होती. 


विडा गावात 150 घरजावई कायमस्वरुपी वास्तव्यास आहेत. धुलीवंदनाच्या दोन दिवस अगोदर जावई शोधण्याची मोहीम गावकरी हाती घेतात. बरेच जावई गावकऱ्यांच्या सापळ्यातून निसटूनही जातात. कोणता जावई कुठे आहे याचा तपास करण्यासाठी गावात पथकही नेमले जातं.  यावर्षी 19 जणांच्या पथकाने जावयाचा शोध घेतला आणि केज तालुक्यातल्या जवळबन येथील अविनाश करपे यांना यावर्षी गाढवावर बसण्याचा मान मिळाला आहे. 
 
लाडक्या जावयाची मिरवणूक संपूर्ण गावातून वाजत गाजत काढण्यात आली. मारुतीच्या मंदिराजवळ येऊन या जावयाला नवीन कपड्याचा आहेर चढविण्यात आला. विशेष म्हणजे गाढवावर बसविण्यात आलेल्या जावयाला दुसऱ्यांदा बसविण्यात येत नाही. ज्या जावयाला गाढवावर बसण्याचा मान मिळतो तो जावईसुध्दा मोठ्या उत्साहाने गाढावावर बसतो.  


एखाद्या जावयाला गाढवावर बसविले जाते आणि रंगपंचमी साजरी केली जाते. हा अनोखा उत्सव पाहण्यासाठी परजिल्ह्यातूनही नागरिक या गावात येतात. तर गाढवावर बसण्याच्या भीतीने भूमिगत झालेले अनेक जावई मानाच्या जावयाचा शोध लागला की परत गावात येतात आणि या अनोख्या उत्सवात सहभागी होतात. 


थट्टा मस्करीत सुरु झालेली ही प्रथा आता या गावची संस्कृती बनलीय. तशी या गावात घर जावयांची संख्या मोठी आहे. साडेसात हजार लोकसंख्या असलेल्या या गावात दीडशेपेक्षा जास्त घरजावई आहेत. मात्र, हेच घरजावई धुलीवंदन आली की गाव सोडून जातात. शेवटी काहीही झाले तरी गावकरी मात्र कोणाला ना कोणाला तरी पडून अखेर गाढवावर बसवतातच. त्यानंतर संपूर्ण गावातून त्याची वाजतत-गाजत मिरवणूक काढली जाते. या मिरवणुकीत संपूर्ण गाव सहभागी झालेला असतो.    


महत्वाच्या बातम्या 


Bhandara SSC Exam : घरी बापाचा मृतदेह, धैर्य दाखवून लेक दहावीच्या परीक्षेला; भंडाऱ्याच्या प्राचीचा धीरोदात्तपणा