Beed News: देशभरात 'हर घर तिरंगा अभियान' सुरू असून, प्रत्येक भारतीय नागरिक आपल्या घराच्या छतावर, दुकानासमोर आणि कार्यालयात तिरंगा ध्वज फडकवत आहेत. दरम्यान बीडच्या केज तालुक्यातील वरपगावात एक दु:खद घटना समोर आली आहे.  घराच्या छतावर तिरंगा ध्वज लावताना विजेच्या धक्क्याने 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे.  मुक्तार आस्कोद्दीन शेख (वय 25 वर्षे, रा. वरपगावात, ता.केज, जि. बीड) असे मृत तरुणाचे नाव आहे. 


याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, केज तालुक्यातील वरपगाव येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या मुक्तारचा छतावर तिरंगा ध्वज लावताना विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. ही घटना 13 ऑगस्ट रोजी दुपारी घडली. शेख कुटुंब शेतात एका पत्र्याच्या घरात वास्तव्यास आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा असे आवाहन केले होते. त्यानुसार मुक्तार शेख हा घराच्या छतावर तिरंगा लावण्यासाठी गेला होता. ज्यात त्याला विजेचा धक्का लागला. 


स्टीलच्या रॉडचा स्पर्श...


देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारने आपल्या देशाचा स्वातंत्र्य अमृत महोत्सव मोठ्या आनंदाने साजरा करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट हे तीन दिवस 'हर घर तिरंगा मोहिमेंतर्गत' प्रत्येक भारतीयांनी आपल्या घरावर तिरंगा ध्वज लावण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे आपल्या पत्र्याच्या घरावर मुक्तार ध्वज लावत होता. तिरंगा लावताना स्टीलच्या रॉडचा स्पर्श तेथील विद्युत तारांना झाला. यानंतर विजेचा जोराचा धक्का बसून मुक्तार जागीच मृत्युमुखी पडला. केज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला होता. 


परिसरात हळहळ...


शेख कुटुंब शेतातील एका पत्र्याच्या घरात वास्तव्य करून आपला उदरनिर्वाह करत होते. मुक्तार आणि त्याचे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुद्धा जेमतेम होती. तर मुक्तारच त्यांच्या घराचा महत्वाचा आधार होता. मात्र मुक्तारच्या या अपघाती निधनानंतर त्याच्या कुटुंबातील सदस्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर गावात आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 


ध्वज लावतांना काळजी घ्यावी...


'हर घर तिरंगा मोहिमेंतर्गत' अनेकजण आपल्या घरावर ध्वज लावत आहेत. मात्र अनेकदा घराच्या जवळून किंवा घरावरून विजेच्या तारा गेलेल्या असतात. अशावेळी ध्वज लावातानी काळजी घेतली पाहिजे. तसेच लहान मुलांना अशा ठिकाणी ध्वज लावण्यासाठी पाठवू नयेत. तसेच 15 ऑगस्ट रोजी संध्याकाळी ध्वज काढतांना सुद्धा अशीच खबरदारी घेण्याची गरज आहे.  देशाचा स्वातंत्र्य अमृत महोत्सव  प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे, मात्र याचवेळी घरावर ध्वज लावतांना काळजी घेणेही गरजेचं आहे. 


महत्वाच्या बातम्या...


Vinayak Mete Death : ..तर आज विनायक मेटेंचा जीव वाचला असता;  मुंबई-पुणे महामार्गावर ट्रॉमा सेंटर हवेतच!


Vinayak Mete Last Rites : विनायक मेटेंचं पार्थिव आज बीडला नेणार, उद्या अंत्यसंस्कार; पोस्टमार्टमसाठी होतोय उशीर