Beed Crime News: गुन्हेगार कितीही हुशार असला आणि कितीही पळण्याचा प्रयत्न केला तरीही पोलीस त्याला शोधून काढतातच अशा अनेक घटना यापूर्वी समोर आल्या आहेत. दरम्यान 13 वर्षे पोलिसांना गुंगारा देणाऱ्या एका गुन्ह्यातील आरोपीला बीड (Beed) पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,  तब्बल तेरा वर्षे फरार राहिलेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी अटक केली आहे. प्रमोद युवराज पटाईत (वय 33 वर्षे, रा. विडा, ता. केज) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. 


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या नेकनूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत 2009 मध्ये दरोड्याच्या तयारी करणाऱ्या टोळीला पकडले होते. मात्र याच टोळीतील आरोपी प्रमोद पटाईत हा फरार झाला होता. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र मागील 13 वर्षे तो पोलिसांना सतत गुंगारा देत होता. मात्र अखेर बीडच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी प्रमोद पटाईत यास 13 वर्षांनी अटक केली आहे. प्रमोद पटाईत हा विडा येथील रहिवासी असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सतीश वाघ यांना मिळाली होती. त्यावरुन त्यांनी हवालदार मारुती कांबळे, बाळकृष्ण जायभाये, राजू पठाण, अर्जुन यादव यांचे पथक रवाना केले. या पथकाने सापळा रचून त्यास ताब्यात घेतले. त्यानंतर प्रमोद पटाईत यास नेकनूर पोलिसांच्या हवाली करण्यात आले.


विशीत केला गुन्हा, अटक झाला बत्तीशीत...


नेकनूर पोलीस ठाणे हद्दीत 2009  मध्ये दरोड्याच्या तयारी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला होता. मात्र, या टोळीतील प्रमोद पटाईत हा फरार झाला होता. गुन्हा केला तेव्हा त्याचे वय जेमतेम 20 वर्षे होते. तेव्हापासून तो पोलिसांच्या हातावर तुरी देत होता. पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी अनेकदा सापळा लावला, मात्र तो काही हाती लागत नव्हता. मात्र प्रमोद पटाईत हा विडा येथे गावी आला आणि स्थानिक गुन्हे शाखेने त्याला ताब्यात घेतले. त्यामुळे वयाच्या 20 व्या वर्षे दरोड्याची तयारी करणारा प्रमोद पटाईत वयाच्या बत्तीशीत पकडला गेला. 


गावात आला अन् अडकला... 


प्रमोद पटाईतचा 2009  मध्ये दरोड्याच्या तयारी करणाऱ्या टोळीत समावेश होता. पण पोलीस त्याला त्यावेळी पकडू शकले नव्हते.  फरार आरोपींच्या यादीत असलेला प्रमोदला पकडण्यासाठी पोलिसांनी अनेक प्रयत्न केले. मात्र तो काही हाती लागत नव्हता. नेकनूर पोलीस आणि गुन्हे शाखा त्याचा सतत शोध घेत होते. पण तब्बल 13 वर्षे प्रमोद पटाईत त्यांना मिळू शकला नाही. मात्र एवढ्या वर्षांनी प्रमोद पटाईत आपल्या विडा या मूळ गावी येणार होता आणि त्याचीच खबर गुन्हे शाखेला लागली. त्यामुळे पथकाने त्याला पकडण्यासाठी गावात सापळा लावला होता. दरम्यान प्रमोद पटाईत गावात येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Beed News: बदलीसाठी अपंगाचे बनावट प्रमाणपत्र, 'त्या' 23 शिक्षकांच्या प्रमाणपत्राचा अहवाल आज होणार सादर