Beed Crime News: गेल्या अठवड्यात कर्नाटकातून पाटोद्यामार्गे अहमदनगरला गुटखा घेऊन जाणारा कंटेनर येवलावाडी फाट्यावर पोलिसांनी पकडून मोठी कारवाई केली होती. त्यांनतर तब्बल 32 लाखांचा गुटखा पकडणाऱ्या पाटोदा पोलिसांचा मोठं कौतुकही झालं होतं. मात्र पकडलेल्या याच गुटख्यातून तब्बल 16 लाखांचा गुटखा ठाणेप्रमुखानेच गायब केल्याचे पोलीस अधीक्षकांच्या चौकशीनंतर समोर आले आहे. त्यामुळे सहायक पोलीस निरीक्षक डी.बी.कोळेकर यांच्यासह आणखी दोघांवर तडकाफडकी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 


कर्नाटकातून अहमदनगरला गुटखा जात असल्याची माहिती 20 जुलै रोजी केजेचे सहायक अधीक्षक पंकज कुमावत यांना मिळाली होती. त्यामुळे त्यांनी पाटोदा पोलिसांना कारवाईबाबत सूचना दिल्या. त्यानुसार पाटोदा पोलिसांनी त्यादिवशी संध्याकाळच्या सुमारास गुटख्याची वाहतूक करणारा कंटेनर पकडला. ज्यात 50 गुटख्याचे पोते होते. मात्र या कारवाईनंतर कंटेनर एका खाजगी कार्यालयात नेऊन त्यातून 16 लाख रुपये किमतीचे 23 पोते उतरवून घेण्यात आले. त्यांनतर पंचनामा करत, अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांना बोलावून 24 लाख 57 हजारांचा गुटखा पकडण्यात आल्याची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला. 


वरिष्ठांना संशय आला आणि...


पाटोदा पोलिसांच्या कारवाईबाबत वरिष्ठ पोलिसांना संशय होता. त्यामुळे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सहायक अधीक्षक पंकज कुमावत यांना चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार कुमावत यांनी पाटोदा पोलीस ठाण्यात जाऊन सर्व घटनेची माहिती घेतली. आरोपी आणि जप्त गुटखा याबाबत चौकशी केली. त्यानुसार 50 पैकी 16 गुटख्याचे पोते गायब झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे कुमावत यांनी आपल्या चौकशीचा अहवाल पोलीस अधीक्षक यांच्याकडे सादर केला. त्यांनतर सहायक पोलीस निरीक्षक डी.बी.कोळेकर,पो.ना. संतोष क्षीरसागर,कृष्णा डोके यांच्यावर तडकाफडकी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.


पोलिसांचे संबध उघड...


स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादाने अवैध धंदे चालतात असे अनेकदा आरोप केला जातो. मात्र पोलिसांच्या विरोधात कोण जाणार म्हणून, सहसा कुणी तक्रारदार समोर येत नाही. मात्र पाटोदा पोलिसांनी कारवाई दरम्यान गुटख्याचे पोते गायब केल्याचे समोर आल्यानंतर त्यांचा गुटखा विक्रेत्यांना अभय होते अशी चर्चा पाहायला मिळत आहे. तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळीच दखल घेतल्याने या सर्व घटनेचा खुलासा होऊ शकला आहे.