बीड : बीडच्या केज तालुक्यातील चिंचोली माळी या ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी चोरीच्या उद्देशाने घरात घुसून एका वृद्ध दाम्पत्यावर हल्ला केला होता. याच हल्ल्यात पांडुरंग राऊत यांचा मृत्यू झाला होता तर त्यांच्या पत्नी शशिकला राऊत यांना गंभीर इजा झाली होती. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.


11 जुलै रोजी चिंचोली माळी  येथे सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान गावापासून काही अंतरावर असलेल्या वस्तीवर पांडुरंग राऊत यांच्या घरी चोरीच्या उद्देशाने एक अज्ञात व्यक्ती घुसली. त्यांनी त्यांच्या पत्नीकडे पिण्यासाठी पाणी मागितलं शशिकला राऊत  पाणी आणण्यासाठी घरात गेल्या. या चोरट्याने त्यांच्यावर झडप घातली आणि त्यांच्या गळ्यातील दागिने ओरबाडून घेतले हा प्रकार पांडुरंग यांच्या लक्षात येताच त्यांनी चोराचा प्रतिकार करायला सुरुवात केली.


पती - पत्नी आणि स्वरामध्ये झटापट सुरू असतानाचा अज्ञात चोरट्याने आपल्या कमरेचा चाकू काढला आणि पांडुरंग राऊत यांच्या पोटात खूपसला.  चाकूचा घाव वर्मी लागतात पांडुरंग राऊत हे जमिनीवर कोसळले आणि त्यांचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पांडुरंग यांना पाहून घाबरलेल्या चोरट्याने ओळख पटू नये म्हणून घरातील लाईट बंद करून दागिने आणि पैसे घेऊन त्या ठिकाणाहून पळ काढला.  या झटापटीमध्ये शशिकला राऊत यांना देखील गंभीर इजा झाली. शशिकला यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 


या प्रकरणी केज पोलीस सर्व बाजूनी तपास करीत होते मात्र सबळ पुरावा नसल्याने आरोपी हाती लागत नव्हता. खुनाची गंभीरता लक्षात घेता पोलिसांनी अधिक तांत्रिक तपास करण्याचे ठरवलं.  एका आर्टिस्टकडून फिर्यादीने दिलेल्या माहितीच्या आधारे रेखाचित्र तयार केले. त्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा, सायबर क्राईम या यंत्रणाचा आधार घेत पांडुरंग राऊत यांचा खून करणारा आरोपी उस्मानाबाद जिल्ह्यातील इटकुर गावच्या बोगा पारधी वस्तीवरील असल्याचे निष्पन्न झाले.


आरोपीची ओळख पटल्यानंतर केज पोलिसांच एक पथक त्याला पकडण्यासाठी रवाना झालं.  हा आरोपी कळंबमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि पोलिसांनी सापळा रचून कळंबच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून राजेंद्र उर्फ शाम शिंदे याला अटक केली. आरोपीला अटक करून पोलिसांनी खात्या दाखवताच हा गुन्हा आपणच केल्याची कबुली त्यांने पोलिसांना दिली आहे.