Beed News: बीड येथील शिक्षक मतदारसंघाच्या प्रचारसभेदरम्यान भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या आधी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी भाषण केले होते. मात्र यावेळी पंकजा मुंडे यांनी आधी आपण भाषण करणार असल्याचा हट्ट केला होता. दरम्यान या सर्व घटनेचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. मात्र काही लोकांनी या घटनेचा बनावट व्हिडीओ एडीट करून तो व्हायरल केला असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. तर याप्रकरणी भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते  गणेश लांडे यांनी गेवराई पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून एका डिजिटल चॅनलच्या पत्रकारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


गणेश मच्छिंद्र लांडे यांनी गेवराई पोलिसांत दिलेल्या फिर्यादिनुसार, 20 जानेवारी 2023 रोजी सकाळी 10 वाजता औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार किरण पाटील यांच्या प्रचारार्थ गेवराई येथील गोदावरी मंगल कार्यालय शिक्षक मेळावा आयोजित करण्यात आला होता. या शिक्षक मेळावाच्या कार्यक्रमासाठी भारतीय जनता पार्टी प्रदेशअध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजप राष्ट्रीय सचिव पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्यासह पक्षातील मान्यवरांच्या उपस्थिती होती. 


व्हिडीओ एडीट करून केला व्हायरल! 


दरम्यान, या कार्यक्रमाच्या दरम्यान पंकजा मुंडे स्वतः अध्यक्ष असतानाही सन्मानार्थ बावनकुळे यांच्या भाषणापूर्वी स्वत: भाषण करण्यासाठी माईकजवळ आल्या. त्याचवेळी प्रदेशअध्यक्ष बावनकुळे यांनी पंकजा मुंडे यांच्या भाषणापूर्वी स्वतः भाषण करण्याचा आग्रह धरला. मात्र बावनकुळे यांनी आदर व्यक्त करत आपण अध्यक्ष आहात, माझ्यानंतर बोला असे पंकजाताई यांना सुचवले आणि तसे घडलेही. त्यानंतर पंकजाताई यांनी शेवटी अध्यक्षीय भाषण केले. परंतु एक डीजीटल न्यूज चैनलने या घटनेची मूळ व्हिडीओ क्लिप वापरून त्यात, चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंकजा मुंडे यांना भाषण न करू देता, पंकजा मुडेंना खाली बसवलं असे टायटल देऊन व्हिडीओ क्लिप प्रसारित केली असल्याचा आरोप तक्रारदार यांनी केला आहे. 


पोलिसांत गुन्हा दाखल! 


चंद्रशेखर बावनकुळे आणि पंकजा मुंडे हे दोन्ही नेते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि जनतेसाठी सन्मानित, आदरणीय व्यक्ती आहेत. या दोन व्यक्तींमधील कोणतीही अवमानकारक घटना घडलेली नसतानाही एका डिजिटल न्यूजचे प्रतिनीधी सोमनाथ मोटे (ता. गेवराई जि. बीड) याने जाणीवपूर्वक सोशल मीडियावर बदनाम करण्याचा आणि जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. या वादग्रस्त क्लिपमुळे कार्यकर्ते आणि जनतेमध्ये तीव्र असंतोष असून, एक डीजीटल न्यूज चैनलवर प्रसारीत करणारे प्रतिनीधी सोमनाथ मोटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी तक्रारदार यांनी केली होती. त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Bawankule on Pankaja Munde : भाजपच्याच नेत्यांकडून पंकजा मुंडेंना बदनाम करण्याचा कट; प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा गौप्यस्फोट