Aurangabad News: गेल्यावर्षी ऊसाचे क्षेत्र वाढल्याने याचा मोठा फटका ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसला होता. सुमारे 50 टक्के ऊस गाळपाअभावी शेतात उभा होता. विशेष म्हणजे सरकारला कारखानदारांना गाळप क्षमता वाढवून देण्याची वेळ आली होती. मात्र एवढं करूनही अनेक शेतकऱ्यांचा ऊस कारखान्यात गेलाच नसल्याने अनेकांनी उभा ऊस पेटवून दिल्याच्या घटना समोर आल्या होत्या. गेल्या वर्षाचा हाच अनुभव घेत यावेळी गाळप हंगाम लवकर सुरु करत असून, यंदा ऊसाचे गाळप 1 ऑक्टोबरपासूनच सुरु करण्यात येणार असल्याची माहिती सहकार मंत्री अतुल सावे यांनी दिली आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. 


गेल्यावर्षी लाखो हेक्टर ऊस गाळपअभावी शेतात उभा होता. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी हतबल होऊन उभा ऊस पेटवून दिले होते. तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठं नुकसान सहन करावे लागले होते. त्यामुळे ही सर्व परिस्थिती पाहता यावेळी लवकर गळीत हंगाम सुरु करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचं सावे म्हणाले. 


काय म्हणाले अतुल सावे...


यावर बोलतांना अतुल सावे म्हणाले की, मागच्या वर्षी ऊस गाळप हंगाम संपल्यावर सुद्धा अनेक शेतकऱ्यांकडे ऊस शिल्लक होता. त्यामुळे यावर्षी अशी परिस्थिती उद्भवणारा नाही यासाठी लवकरच ऊस गाळप हंगाम सुरु करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. त्यानुसार 15 सप्टेंबरला याबाबत एक बैठक घेऊन 1 ऑक्टोबरपासून गाळप सुरु करण्याचं ठरलं आहे. पंधरा दिवस अगोदरच गाळप सुरु केल्यास शेवटच्या टप्प्यात ऊस उरणार नाही असं सावे म्हणाले. सोबतच यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार आणि सरकारला सुद्धा नुकसानभरपाई देण्याची गरज पडणार नाही असेही सावे म्हणाले आहेत. 


मोबाईल ॲपवरून करता येणार नोंदणी...


यावर्षी आम्ही एक नवीन मोबाईल ॲप तयार केला आहे. ज्यात शेतकऱ्यांना नोंदणी करता येणार आहे. यावेळी नोंदणी करतांना शेतकऱ्यांना त्यांच्या जवळच्या कारखान्याचा पर्याय उपलब्ध करून दिला जाईल. सोबतच दोन कारखान्यात नोंदणी करता येणार असून, ज्यात आपला ऊसाची क्वालिटी काय आहे, आपला ऊस कधी लागलेला आहे, त्यानुसार ॲपच्या माध्यमातून ऊस कारखान्यात पाठवता येणार, असल्याचं सावे म्हणाले. 


एफआरपी बाबत लवकरच बैठक...


शेतकऱ्यांना ऊसाचा बिलाचा हप्ता म्हणजेच एफआरपी दोन टप्प्यात दिले जाते. मात्र बहुतांश वेळा शेतकऱ्यांना दुसरा हप्ता दिलाच जात नाही. त्यामुळे यावर सुद्धा सरकार तोडगा करणार असल्याचं सावे म्हणाले आहेत. यावर आम्ही नियंत्रण आणणार आहोत. यासाठी लवकरच एक बैठक बोलावली जाणार आहे. ज्यात सर्व साखर कारखान्याच्या मालकांना बोलवण्यात येईल. त्यांच्याशी चर्चा करून एफआरपी बाबत कसे नियंत्रण आणता येईल यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचं अतुल सावे म्हणाले आहेत.